रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने तालुकास्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) समाजात अनेक दिव्यांग व्यक्ती आहेत. परंतु या व्यक्ती त्याच भांडवल न करता स्वतःच्या पायावर उभं राहत काही ना काही व्यवसाय करत असतात. त्या शरीराने जरी दिव्यांग असल्या तरी मनाने नाही असे प्रतिपादन रामलिंग महिला रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.

 

रविवार (दि 3) रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन दरवर्षीप्रमाणे रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ज्योती निलेश गोसावी यांना सन 2023 चा तालुकास्तरीय प्रेरणा पुरस्कार देण्यात आला. दिव्यांग व्यक्ती समाजात सामाजिक कार्य करत असतात. या व्यक्तींना सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दरवर्षी प्रेरणा पुरस्कार वितरण केले जाते .

 

रामलिंगचे उपसरपंच बाबाजी वरपे बोलताना म्हणाले, दिव्यांग व्यक्तीसाठी ग्रामपंचायतमध्ये जो निधी असतो. तो वेळेत त्यांना दिला जाईल. तसेच दिव्यांगाना ग्रामपंचायत कडुन जे सहकार्य लागेल ते  आम्ही करु असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ज्योती निलेश गोसावी यांना ट्रॉफी,श्रीफळ ,शाल देऊन बाबाजी वरपे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

यावेळी रामलिंगचे माजी उपसरपंच संजय शिंदे, यशवंत कर्डिले, अ‍ॅड रवींद्र खांडरे,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे, डॉ वैशाली साखरे, देंडगे तसेच रामलिंगच्या ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.