शिरुर ग्रामीण बाबुराव नगर येथील सांडपाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) गेल्या दिड महिन्यापासून बाबुरावनगर, वर्पेनगर,बाफना मळा येथे सांडपाणी लाईन खराब झाल्याने सर्वत्र गटाराचे साम्राज्य पसरले असुन त्यामुळे अनेक नागरिक डेंग्यूने आजारी आहेत. या ड्रेनेजलाईनचे काम करावे पूर्वीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ववत करुन द्यावे या मागणीसाठी स्थानिक नुकताच येथील स्थानिक नागरिकांनी बाफनामळा ते पंचायत समिती कार्यालय असा पायी काढला होता. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बाबुराव नगर येथील नागरीकांनी असुविधेमुळे पंचायत समितीवर मोर्चा काढला. गेली अनेक वर्ष करोडो रुपये कर मिळुन सुध्दा शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत नागरिकांना रस्ते, ड्रेनेज आदी सुविधा पुरवू शकलेली नाही. त्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे.

यावेळी बहुजन पालक संघाचे नाथा पाचर्णे, शिरुर तालुका मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, प्रा चंद्रकांत धापटे, युवराज सोनार, सागर घोलप, राजश्री शिंदे, विद्या शिंदे, नंदा गुंदेचा, सुनीता उगले, सुरेखा मोरे, शंकुतला साळुंके, सुमन साळूंके, अलका शिर्के, संदिप भोसले, सुरेश शेलार, संतोष वाघमारे, धनंजय अभंग, रेवणनाथ इंगळे, राणी शेख, सविता राहाणे, सुजल पाटील, ऐश्वर्या ढोरजकर, कांताबाई सात्रस, जनाबाई भोसले आदी उपस्थित होते

यावेळी नाथा पाचर्णे म्हणाले की शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक नागरिक डेंग्यूने त्रस्त झाले आहेत. तसेच अनेक बोअरवेल गटाराच्या पाण्यामुळे खराब झाले असून आरोग्याच्या समस्या त्यामुळे निर्माण झाल्या आहेत. गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरुर यांच्या आदेशाला सुद्धा ग्रामपंचायतकडून केराची टोपली दाखविल्याचे पाचर्णे यांनी सांगितले. मूलभूत सुविधा मिळाल्या पाहीजेत चांगले ड्रेनेज व रस्त्याचे आश्वासन पदाधिकारी यांनी दिले होते .पण प्रश्न सुटले नाहीत . ड्रेनेजसह अन्य प्रश्न न सोडविल्यास प्रशासनाची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा त्यांनी दिला .

सामाजिक कार्यकर्ते श्यामकांत वर्पे म्हणाले, या भागात रस्ते, पाणी, ड्रेनेजचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिरुर ग्रामीण परिसर मोठ्या झपाट्याने विकसित होत आहे .त्यादुष्टीने मूलभुत सोयी सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे .प्रा चंद्रकांत धापटे म्हणाले आम्ही स्थानिक नागरिक गेल्या अनेक महिन्यापासून दुर्गंधी व आरोग्य समस्येने त्रस्त आहेत ऐश्वर्या ढोरजकर म्हणाल्या दुर्गंधी युक्त घाणेरडे पाणी घरा पर्यत पोहोचले आहे .पाण्याचा घाण वास येतो . सामान्य माणसांस या सगळ्या प्रश्नाना सामोरे जावे लागत आहे . पाण्याची तपासणी करु आराखडा करु असे आश्वासन दिले त्याचे काय असे सांगून आता या प्रश्नावर रडायचे नाही तर लढायचं आहे.

शिरुर ग्रामीणचे उपसरपंच बाबाजी वर्पे म्हणाले की बाफनामळा व त्यापरिसरातील नागरिकांनसाठी पर्यायी ड्रेनेज वाहिनी टाकण्याचा प्रयत्न करु .हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान यावेळी सहाय्यक गटविकास आधिकारी राम जगताप, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे , तर्डोबावाडीचे सरपंच जगदीश पाचर्णे, शिरुर ग्रामीण चे माजी सरपंच अरुण घावटे, उपसरपंच बाबाजी वर्पे उपस्थित होते .

दरम्यान या प्रश्नी गटविकास आधिकारी यांच्याशी राहुल पाचर्णे यांनी मोबाईलवरुन संपर्क साधला. तसेच सांडपाण्याच्या प्रश्नासंदर्भातील माहिती दिली. या प्रश्नी दोन्ही ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी आणि गटविकास आधिकारी यांची एकत्रित बैठक घेवून या प्रश्नी मार्ग काढण्यात येईल असे राहूल पाचर्णे म्हणाले.