अयोग्य भू संपादान संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. धनंजय खेडकर यांची माहिती
शिक्रापूर: शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी चासकमान सह इतर अनेक प्रकल्प ग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आलेले असून सदर जमिनींचे अयोग्य पद्धतीने अधिकाऱ्यांच्या पिशाच्च भुतांना जमीनी देण्यात आल्याने शिरुर तालुक्यातील जमिनींना भुताटकी लागली असल्याने सदर भुताटकी जाण्यासाठी लवकरच भूतयज्ञ करणार असल्याची माहिती अयोग्य भू संपादन संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. धनंजय खेडकर यांनी दिली आहे.
शिरुर तालुक्यातील प्रकल्प राखीव जमिनींचे बेकायदेशीरपणे वाटप करण्यात आलेले असल्याने अयोग्य भू संपादन संघर्ष समितीच्या वतीने अनेक दिवसांपासून लढा सुरु आहे. मात्र यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी उघड झालेल्या असून कित्येक अधिकाऱ्यांचा या कृतीमध्ये समावेश असल्याचे समोर आले, तर काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली.

परंतु चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनींचे वाटप केले जात असून देखील वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेते दुर्लक्ष करत असल्याने शिरुर तालुक्यातील जमिनींना लागलेली भुताटकी घालवून अयोग्य भूसंपादन व बोगस पुनर्वसनातून मुक्ती मिळवण्यासाठी लवकरच नैमित्तिक यज्ञाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये यज्ञपात्र हे चासकमान धरणासह शिरुर तालुक्यातील ठराविक गावातील माती व पाणी वापरुन बनवण्यात येणार आहे. तर यज्ञात साहित्य म्हणून चुकीच्या भूसंपादनाची कागदपत्रे व बोगस धरणग्रस्त जमीन वाटपाच्या कागदपत्रांचा वापर करण्यात येणार आहे.
सदर यज्ञाचा मुहर्त पुरोहित गुरुजींकडून घेत सर्व बाधित शेतकरी उपस्थित राहून यज्ञासाठी प्रार्थना करत चासकमान शब्दाचा जप करणार आहेत. मात्र या अनोख्या विधीसाठी राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे देखील अयोग्य भू संपादन संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. धनंजय खेडकर यांनी सांगितले.