दहिवडीतील विवाहितेचा सासरच्यांकडुन दहा लाखांसाठी छळ

शिरूर तालुका

शिक्रापुर (शेरखान शेख) दहिवडी (ता. शिरुर) हे माहेर असलेल्या महिलेचा सासरच्या लोकांनी दहा लाख रुपयांसाठी शारीरक व मानसिक छळ केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बंडोपंत उर्फ संतोष सोपान धायगुडे, सोपान पांडुरंग धायगुडे, अनुसया सोपान धायगुडे, मैना भरत कोळेकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दहिवडी येथील सारिका धायगुडे हिचा विवाह २०१९ मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील बंडोपंत उर्फ संतोष धायगुडे याच्या सोबत झाला. लग्नानंतर सारिकाच्या पतीसह सासू सासरे माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी तिच्याकडे करु लागले. त्यानंतर सारिका पैसे आणत नसल्याने सासरचे लोक तिला शेतातील जादा कामे करायला लावून, तिला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ करु लागले. त्यामुळे सारिका माहेरी आई वडिलांकडे आली. दरम्यान सारिकाने याबाबत शिरुर न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर सारिकाच्या पतीने दहिवडी येथे येत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत सारिकाने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.

त्यामुळे सध्या घडलेल्या सर्व प्रकाराबाबत सारिका बंडोपंत धायगुडे (वय २६) सध्या रा. दहिवडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. हांगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर या विवाहीतेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विवाहितेचा पती बंडोपंत उर्फ संतोष सोपान धायगुडे, सासरा सोपान पांडुरंग धायगुडे, सासू अनुसया सोपान धायगुडे, नणंद मैना भरत कोळेकर सर्व रा. हांगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहेत.