कासारीत विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील नरकेवाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला असल्याने महिलांना त्यांच्या क्षेत्रात कार्य करण्यास उर्जा मिळाली आहे.

कासारी (ता. शिरुर) येथील नरकेवाडी येथे महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त गावातून क्रांतिज्योतीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या चेतना ढमढेरे यांचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सुनीता भुजबळ, अंकिता भुजबळ, माजी उपसरपंच गोपाळ भुजबळ, पोलिस पाटील रूपाली भुजबळ, तेजश्री भूमकर, अनिल नरके, गोपीनाथ नरके, बापु नरके, अमोल भुजबळ, दिलीप नरके यांसह आदि पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत सदस्या, माजी सरपंच, कृषी सहायक, पोलिस पाटील, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका अशा एकूण चाळीस कर्तृत्ववान महिलांचा शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलिस हवालदार उज्ज्वला गायकवाड व ज्योती आहेरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल नरके यांनी केले, तर पोलिस पाटील रूपाली भुजबळ व तेजश्री भूमकर यांनी सूत्रसंचालन केले आणि माजी उपसरपंच गोपाळ भुजबळ यांनी आभार मानले.