बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या सचिन जोरीच्या कुटुंबाची वन विभागाकडून होतेय अवहेलना…?

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता.शिरुर) येथील सचिन बाळू जोरी (वय ३८) या तरुणाचा दीड महीन्यांपुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला होता. सदर ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. 4 ते 5 दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या मृतदेह अर्धे खाललेले व कुजलेल्या अवस्थेतील शरीर, डोक्याची कवटी व हात अशा स्वरुपात आढळून आला होता.

मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना सुरु असून वनविभागाकडून त्याच्या घरच्यांना अद्याप कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही. वनविभागाने नेमकी त्याचा कशामुळे मृत्यू झाला यासाठी हैदराबाद, पुणे येथे शरीराचे काही नमुने पाठवला असता ते खराब झाल्याचे वनविभागाकडून सांगितले जात असून दिड महीना ऊलटूनही त्याचे रिपोर्ट अद्यापपर्यंत मिळाले नाही असे मृत सचिन जोरी यांचे बंधू संदीप जोरी यांनी सांगितले. ते वारंवार वन विभाग व पोलिस स्टेशनला चकरा मारत असून अद्याप ते मदतीपासून वंचीत आहे.

तसेच या भागातील राजकीय व्यक्तींनी अदयापपर्यंत त्यांच्या घरच्यांना भेट दिली नाही. मृत सचिन जोरी हे आदर्श माध्यमिक विदयालय जांबुत येथे शिक्षक, क्लार्क म्हणुन काम करत होते. घरातील ते कर्ते पुरुष होते. त्यांच्या आई -वडीलांचा, भावाचा आधार हरपला असून त्यांच्या घराकडे जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नाही. शासन दरबारी मागणी करुनही अदयाप रस्ता न झाल्याने त्यांचे वडिल पाय घसरुन पडल्याने गंभीर जखमी झाले आहे.

मृत पुजा नरवडे बरोबरच सचिन जोरी यांच्या घरच्यांनाही त्यांचे हेलपाटे बंद करुन तातडीने त्यांना न्याय मिळवून आर्थिक मदत वनविभागाने द्यावी. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे शेतकरी सेनेचे माऊली ढोमे, डॉ. संतोष ऊचाळे यांनी सांगितले आहे. या भागात शेकडो बिबटे असून एखादा बिबट्या पिजं-यात अडकल्यावर तोच नरभक्षक आहे हे कशावरुन ठरवणार? असा सवाल येथील नागरीकांकडून उपस्थित होत असून वन विभागाने रात्रीची गस्त घालून पुरेश्या पिंजऱ्यांसह बिबट्यांच्या खादयाची सोय करणे गरजेचे आहे..