योगासनाला जीवनाचा भाग करून घेणे गरजेचे; प्रा. रामदास थिटे

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): आपले सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगासने ही जीवन संजीवनी आहे. शरीर ‘मन ‘आणि श्वासाचे एकमेकांशी संतुलन साधल्याने जीवनाचा प्रवास शांत, प्रसन्न ,रम्य आणि उत्साही होत राहत असतो. मन, बुद्धी ,जीव हे शरीराचे आश्रयाने राहतात. प्रत्येक अवयवाला व्यायाम घडणे गरजेचे आहे. हात,पाय, पोट, फुफ्फुसे हृदय यांच्या नियमित हालचाली दररोज घडणे म्हणजे अवयवांचे सुरेल संगीत होय. यम, नियम आसन, प्राणायाम ध्यानधारणा, योगासने ही जीवनाचा अविभाज्य भाग बनावी ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य रामदास थिटे यांनी केले.

जातेगांव बु ( ता. शिरुर ) येथे ९ व्या जागतीक योग दिनानिमित्ताने श्री संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक सुमित भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना विविध आसने व योग प्रकारांची प्रात्यक्षिके करुन दाखविली. ताडासन, पद्मासन, वज्रासन, हलासन, त्रिकोणासन, धनुरासन, शिर्षासन तसेच पाठीवरील व पोटावरील विविध आसने याप्रसंगी विद्यार्थ्यांनी माहिती करुन घेतली. विद्यार्थी घटकांची निसर्गदत्त क्षमता टिकावी यासाठी शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम कसा आवश्यक आहे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक कांतीलाल धुमाळ, प्रमोद काळे, विजय वर्पे, गणेश बांगर, रोहिदास लवांडे आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम परिश्रम घेतले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुगंधराव उमाप, उपाध्यक्ष कांतीलाल उमाप व सचिव प्रकाश पवार यांनीही कौतुक केले.