करंदीत पुन्हा धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

शिरूर तालुका

शिक्रापुर (शेरखान शेख) करंदी (ता. शिरुर) येथे वारंवार बिबट्याचे जनावरांवर हल्ले तसेच नागरिकांना दर्शन होत होते. यापूर्वी एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. तर एका बिबट्याचा मृत्यू झालेला असताना आज पुन्हा एका बिबट्याला जेरबंद करण्यात शिरुर वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.

करंदी येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. शिरुर वनविभागाच्या वतीने येथील बाळासाहेब दरेकर यांच्या पोल्ट्री शेजारी पिंजरा लावण्यात आलेला होता. आज रविवार (दि 16) रोजी सकाळच्या सुमारास गणेश दरेकर हे त्यांच्या पोल्ट्रीत गेले असताना त्यांना सदर पिंजऱ्यात बिबट्या अडकला असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर आणि वनरक्षक बबन दहातोंडे यांना मिळताच वनमजूर आनंदा हरगुडे, पोलीस पाटील वंदना साबळे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, परमेश्वर दहीरे यांनी सदर ठिकाणी धाव घेत उपसरपंच पांडूरंग ढोकले, सामाजिक कार्यकर्ते दत्ता दरेकर, अतुल दरेकर, अरविंद ढोकले, प्रमोद दरेकर, प्रशांत दरेकर, दिलीप दरेकर, दत्तात्रय भागवत, अजय भोसले, नारायण अवचर, प्रकाश पंचमुख यांसह आदी नागरिकांच्या मदतीने सदर बिबट्याला जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रात हलविले. दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ग्रामस्थ व नागरिक वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक करत आहेत.

 

नागरिकांनी शांतता पाळणे गरजेचे…

कोठेही बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर अनेक नागरिक बिबट्याला त्रास देत असतात त्यामुळे नागरिकांसह बिबट्याला देखील इजा पोहचू शकते परंतु कोठेही बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यास नागरिकांनी गोंधळ न करता शांतता पाळणे गरजेचे असल्याचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड सर्पमित्र शेरखान शेख यांनी सांगितले.