…म्हणून शासकीय भूखंडात बांधली स्मशानभूमी

शिरूर तालुका

अहवाल सादर करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतला आदेश

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे स्मशानभूमी नसताना देखील जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे असलेल्या जमिनीत स्मशानभूमी बांधल्याची घटना समोर आली असल्याने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील जमीन गट नंबर ४२/५०/५८९ मधील प्लॉट नंबर ११९ मधील जमिनीचे क्षेत्र जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे असून सदर जमीन प्रकल्पग्रस्त बाधितांना वाटप करण्यात आलेली आहे. मात्र सदर जमिनीत स्मशानभूमी बांधण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सदर जमिनीवर स्मशानभूमीचे काम कसे काय केले, कोणी केले तसेच सदर ठिकाणी शौचालय कोणी बांधले याबाबतची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश यापूर्वी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले.

मात्र ग्रामपंचायत कार्यालयाकडून कोणतीही माहिती अथवा अहवाल प्रांताधिताकाऱ्यांना देण्यात आला नाही. मात्र सदर प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी याबाबतचे अहवाल तातडीने सादर करण्याचे पुन्हा प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले त्यामुळे आता अशा पद्धतीने चुकीचे काम कोणी केले. कोणत्या निधी अथवा फंडातून हे काम करुन कोणी कोणता निधी लाटला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिक्रापूर येथील राऊतवाडी मधील स्मशानभूमी बाबत प्रांताधिकाऱ्यांचे पत्र मिळालेले असून सदर ठिकाणी बांधलेली स्मशानभूमी पूर्वीच्या काळात झालेली असून ती स्मशानभूमी कधी बांधण्यात आलेली आहे. तसेच त्यावर कोणत्या फंडातून खर्च करण्यात आला याबाबत माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.