नाशिकच्या पोलीस अकॅडमीत शिरुरचा झेंडा, अभिजीत काळे बेस्ट ऑल राऊंडर कॅडेट

मुख्य बातम्या शिरूर तालुका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

शिरुर (सतिश डोंगरे): नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) प्रशिक्षण बॅच-१२२ मध्ये महाराष्ट्रातील ४९३ प्रशिक्षणार्थींन मधून शिरुर तालुक्यातील निमोणे येथील अभिजीत काळे हा पहिला आला. त्यास ‘बेस्ट ऑल राऊंडर कॅडेट’ हा बहुमान मिळाला आहे.

शिरूर तालुक्याला पहिल्यांदा हा बहुमान मिळाला आहे. शनिवारी नाशिक येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात अभिजित काळे यांस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बहुमानासह स्व.यशवंतराव चव्हाण कप आणि मानाची रिव्हॉल्वर प्रदान करण्यात आली. यावेळी पोलीस दलातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अभिजीत याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सन २०१९ मध्ये दिली होती. मात्र कोरोनामुळे त्यावेळी निकाल राखून ठेवण्यात आला होता. सन २०२२ मध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर उपनिरीक्षक पदी अभिजीत याची निवड झाली त्यानंतर नाशिकला त्याचे प्रशिक्षण सुरु होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) प्रशिक्षण बॅच-१२२ मध्ये महाराष्ट्रातील ४९३ प्रशिक्षणार्थींन मधून अभिजीत काळे पहिला आल्याचे जाहीर करण्यात आले. ही बातमी समजताच त्याच्या निमोणे गावासह शिरुर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

अभिजित याचे प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी गणेगाव दुमाला व न्हावरे येथे झाले तर माध्यमिक शिक्षण शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत झाले. त्यानंतर त्याने पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातून डिप्लोमा पूर्ण केला. त्याचे वडील शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर आई गृहीणी आहे.

मार्ग खडतर होता पण जिद्द कायम ठेवली

महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत प्रशिक्षण सत्रात पहीला आलो याचा मनापासून आनंद आहे. पोलीस सेवेचे आकर्षण लहानपणापासूनच होते परंतू मार्ग खडतर होता पण जिद्द कायम ठेवली. सन २०१६ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन २०१७ मध्ये पहीली पूर्व परीक्षा दिली त्यामध्ये अपयश आल्यानंतर पुन्हा सन २०१८ मध्ये ही परीक्षा दिली त्यात यशस्वी झालो. आई – वडीलांचे मार्गदर्शन तसेच गावातील थोरा- मोठ्यांचे आशिर्वाद यामुळे मी यशाला गवसणी घालू शकलो.

अभिजित काळे

पोलीस उपनिरीक्षक