निमगाव दुडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): निमगाव दुडे (ता. शिरूर) येथे सचिन बाबाजी गोरडे यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तीला ठार केल्याची घटना बुधवार (दि. १२) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

सचिन बाबाजी गोरडे यांच्या घराजवळ रात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंगणात बांधलेल्या कालवडीवर अचानक हल्ला करून ठार केले. इतर जनावरे ओरडल्याचा आवाज आल्यावर गोरडे कुटुंबीय जागे झाले तोपर्यंत बिबट्याने तिचा फडशा पाडला होता. या घटनेने सचिन गोरडे यांचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा वनपाल गणेश पवार यांच्या आदेशाने वनरक्षक नारायण राठोड व वन कर्मचारी हनुमंत कारकुड यांनी केला.

यावेळी टाकळी हाजी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कलथे हे उपस्थित होते. निमगाव व कवठे परिसरात बिबट्याचे दर्शन हे नित्याचे झाले आहे. या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असल्याने बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी उद्योजक रामभाऊ गायकवाड व उपसरपंच संदीप वागदरे यांनी केली आहे. पाळीव प्राण्यांची सुरक्षा घेण्यासाठी त्यांना बंदिस्त गोठ्यात ठेवणे आवश्यक असल्याचे वन खात्यातर्फे सांगण्यात आले त्यामुळे त्यांना पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्यास अटकाव होईल.