शेतकऱ्यांच्या हितासाठी खरीप हंगाम नियोजन बैठक उत्साहात पार; आमदार माऊली कटके यांचे मार्गदर्शन

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेती विभागाने अधिक गतिशीलतेने काम करावे, असे आवाहन आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी केले. शिरूर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात आज सकाळी 10 वाजता खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक तालुका कृषी अधिकारी शिरूर व हवेली आणि पंचायत समिती शिरूर व हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.

या बैठकीत शिरूर तालुक्याचे कृषी अधिकारी सुवर्णा आदक व हवेली तालुक्याचे एम. डी. साळे यांनी खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. याशिवाय, खत व बियाणे याबाबत पंचायत समिती शिरूरचे कृषी अधिकारी दिनेश आडसुळ आणि हवेलीचे कृषी अधिकारी डॉ. गजानन नारकर यांनी सविस्तर माहिती दिली.

शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाडगे यांनी पिकांना हमीभाव मिळावा अशी मागणी शासनाकडे केली, तर गणेगावचे सरपंच तुकाराम निंबाळकर यांनी कांदा चाळ अनुदान वाढीबाबत सूचना मांडल्या.

आमदार माऊली कटके यांनी यावेळी कृषी विभाग व पंचायत समित्यांना खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर सेवा आणि सुविधा देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यात केळी व आंबा लागवड क्षेत्रात वाढ करून निर्यातक्षम उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.कांदा चाळ अनुदान वाढविण्यात आले असून आता २५ टन क्षमतेच्या चाळीस एका टनाला ५००० रुपये अनुदान दिले जाणार आहे, असे आमदार कटके यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत लाभार्थींना – आंबळे येथील सीमा बेंद्रे आणि शिक्रापूर येथील नंदाताई भुजबळ – यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय बाजरी पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ताराबाई बांदल यांचाही गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, रामभाऊ कदम, गावचे सरपंच, उपसरपंच, खरेदी विक्री संघाचे संचालक, महावितरण अधिकारी, पीडीसीसी बँक अधिकारी आणि कृषी विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक जयवंत भगत यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी डॉ. गजानन नारकर यांनी मानले.