crime

शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात…? पोलिस ‘सिंघमगिरी’ दाखवणार का…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या 20 ते 25 वर्षात मोठया प्रमाणात कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापुर, रांजणगाव, कारेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभी राहिल्याने जमिनीचे भाव गगनाला भिडले. जमिनीच्या खरेदी-विक्रीतुन तसेच औद्योगिक वसाहतीमधुन वेगवेगळ्या कामांच्या ठेक्यातुन मिळणारा बेसुमार पैसा आणि त्या पैशाच्या हव्यासापोटी निर्माण झालेला जीवघेणा संघर्ष यातून शिरुर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असुन याला आवर घालण्यासाठी पोलिसांनी आता कठोर भुमिका घेत ‘सिंघमगिरी’ दाखविण्याची वेळ आली आहे.

 

शिरुर तालुक्यात चासकमान आणि घोड धरणाच्या पाण्यामुळे लाखों हेक्टर जमिनी ओलिताखाली आल्या असुन काही अपवाद वगळता तालुक्यात बागायती क्षेत्र आहे. तसेच पुणे-नगर महामार्गाच्या कडेला असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे अनेक गावात परप्रांतीय कामगार राहत असल्याने शिरुर तालुक्यातील मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. परप्रांतीय कामगारांमार्फत तालुक्यातील विविध गावात बेकायदेशीर गावठी कट्टे विकत घेऊन काही समाजकंटकाकडुन दहशत निर्माण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे.

 

आजकालची युवापिढी इंटरनेटवरच्या वेबसिरीज तसेच मारधाड असलेले भडकाऊ चित्रपट बघून कोयता, तलवार यासारखी जीवघेणी हत्यारे आणि गावठी बंदुकीच्या आकर्षणापायी गुन्हेगारीच्या दलदलीत फसत चालली असुन त्यातून शिरुर तालुक्यात किरकोळ कारणावरुन एखाद्यावर कोयत्याने वार करणे किंवा बंदुकीतुन गोळीबार करणे हे प्रकार शिरुर तालुक्यात सर्रास घडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव MIDC आणि शिक्रापुर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत वेळोवेळी गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत. परंतु पोलिसांनी आता याबाबत कडक पाऊल उचलने गरजेचे आहे. अन्यथा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

 

निवडणुकीपुर्वी कोम्बिंग ऑपरेशन राबवणे गरजेचे…?

काही दिवसातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असुन त्या निवडणुकांपुर्वी पोलिसांनी शिरुर तालुक्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवत प्रत्येक गावातून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची माहिती काढत त्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सर्च ऑपरेशन राबवल्यास अनेक ठिकाणी पोलिसांना कोयता, तलवार तसेच गावठी बंदुक यासारखी जीवघेणी शस्त्र सापडू शकतात. कारण शिरुर, रांजणगाव आणि शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या अनेक औद्योगिक वसाहतीत यापुर्वीही पोलिसांनी अशा कारवाया केलेल्या आहेत.

 

गुन्हेगारीच्या चक्रव्युहात अडकताहेत युवक… 

शिरुर तालुक्यातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीत मोठया प्रमाणात युवकांचा सहभाग दिसुन येत असुन त्यामध्ये बाल गुन्हेगारांचाही सहभाग आहे. परप्रांतीय कामगारांमध्ये अनेकवेळा गुन्हेगार प्रवृत्तीचे तसेच तडीपार असलेल्या युवकांचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले असुन शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव तसेच शिक्रापुर पोलिसांनी आता या गुन्हेगारांना ‘सिंघमगिरी’ दाखवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरीक करत आहेत.

(क्रमश:)