पाबळ मध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

शिरूर तालुका

वनविभाग व प्राणी मित्रांच्या सतर्कतेने बिबट्या उपचारासाठी दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे थापेवाडी मध्ये बेल्हा जेजुरी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला असताना वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सतर्कतेने बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील थापेवाडी येथे बेल्हा जेजुरी महामार्गावर २६ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्या जखमी झाला याबाबतची माहिती शिरुर वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनपाल गणेश पवार, वनरक्षक ऋषिकेश लाड, अभिजित सातपुते, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, पोलीस नाईक विशाल देशमुख, आंबेगाव वनविभागाच्या वनरक्षक साईमाला गिते, वाममजूर बाळू आदक, प्रवीण मांदळे यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत जखमी बिबट्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी हलविले.

दरम्यान बिबट्यावर सदर ठिकाणी उपचार सुरु करण्यात आले असून वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या तत्परतेने बिबट्यावर उपचार सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.