Manoj Jarange Patil

पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मोर्चामुळे 23 आणि 24 जानेवारीला पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत मंगळवार (दि 23) रोजी दुपारपासूनच मोठे बदल करण्यात येणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चात (दि 23) जानेवारी रोजी या मोर्चात शिरुर येथून मोठया संख्येने मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी पुणे पोलिसांनी महामार्गासह काही रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

बीड, नगर जिल्ह्यातून मुंबईला जाणारा हा मोर्चा पुणे-नगर रोडमार्गे जाणार असुन मंगळवार (दि 23) जानेवारी रोजी कोरेगाव भीमामार्गे वाघोली येथे मुक्कामासाठी येणार असून बुधवारी (दि 24) जानेवारी रोजी हा मोर्चा नगर रोडवरून पुणे शहरामार्गे लोणावळ्याच्या दिशेने मार्गस्थ होईल.

 

मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण मोर्चा दि 23 जानेवारी 2024 रोजी रांजणगांव येथुन निघुन कोरेगांव भिमा मार्गे चोखीदाणी, खराडी येथे मुक्कामी थांबणार असून दि 24 जानेवारी 2024 रोजी चोखीदाणी, खराडी येथुन निघुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून लोणावळा येथे मुक्कामी थांबणार आहे.

 

मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये मोठया संख्येने मराठा बांधव वाहनांसह सहभागी होणार असल्याने मोर्चा मार्गावर तसेच आजुबाजुच्या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच आसपासच्या परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्याकरीता तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सदर परिसरातील वाहतूकीत बदल करणे आवश्यक असल्याने (दि 23) जानेवारी रोजी मराठा आरक्षण मोर्चा रांजणगाव गणपती येथून निघून कोरेगाव भीमा मार्गे नगर रोडवरील चोखीदाणी, खराडी येथे मुक्काम करेल.

 

दि 23 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजल्यापासुन आवश्यकतेप्रमाणे पुण्यावरुन अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात येईल.

 

1) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन तसेच कोल्हापूर, सातारा येथुन अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज – खडी मशिन चौक मंतरवाडी फाटा हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगांव चौफुला-न्हावरे व शिरुर मार्गे जातील.

 

2) वाघोली, लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथुन वाहतूक केडगांव चौफुला न्हावरे मार्गे शिरुर ते अहमदनगर अशी वळविण्यात येईल.

 

3) पुणे शहरातुन अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपासमार्गे उजवीकडे वळण घेवून मगरपट्टा चौक-डावीकडे वळण घेऊन सोलापूर रोडने यवत केडगांव चौफुला-न्हावरे-शिरुर मार्गे जातील.

 

(दि 23) रोजी मराठा आरक्षण मोर्चा चोखीदाणी, खराडी परिसरामध्ये मुक्कामी राहणार आहे आणि पुढे (दि 24) रोजी पुणे शहरामधुन पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये जाणार आहे. त्याच अनुषंगाने सर्व प्रकारची वाहतूक (दि 24) रोजी आवश्यकतेनुसार खालीलप्रमाणे वळविण्यात येईल.

 

1) अहमदनगरकडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथुन केसनंद थेऊर मार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील.

 

2) वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळवाडी मांजरी खुर्द मांजरी बुद्रुक-केशवनगर मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील.

 

3) पुणे शहरामधुन अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी धानोरी लोहगांव वाघोली मार्गे अहमदनगरकडे अशी वळविण्यात येईल.

 

मराठा आरक्षण मोर्चा जसजसा पुढे मार्गस्थ होईल, त्याप्रमाणे मोर्चाचे मागील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे, तरी वाहनचालकांनी वर नमुद वाहतूक बदलांचा अवलंब करुन वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.