शिरुर तालुक्यातील पारोडीत उभारतेय नक्षत्र वन

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) हे स्वर्गीय माजी आमदार पोपटराव कोकरे व माजी उपसरपंच असलेले राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे ज्येष्ठ कै. विष्णुपंत कोकरे यांचे गाव असून या गावात पुणे जिल्ह्यातील पहिला नक्षत्र वन प्रकल्प उभारला जात असून नुकतेच येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे असून लवकरच येथे वनासह उद्यान उभारण्यात येणार आहे.

पारोडी (ता. शिरुर) येथे उपसरपंच शशिकांत कोकरे यांनी नक्षत्र वनाची संकल्पना मांडत सदर प्रकल्प करोणा महारोगासह अन्य आजारासाठी नागरिकांना किती फायदेशीर आहे हे समजून दिले होते. त्यानंतर उद्योजक संतोष गवारे यांच्या माध्यमातून एका सामाजिक संस्थेच्या मदतीने येथे देहूचे ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण सोहळा पार पडला.

यावेळी ग्रामविकास अधिकारी मंगल लगड, उपसरपंच अविनाश येळे, भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित खैरे, रवींद्र दोरगे, बाबुपाटील ढमढेरे, देहुचे माजी सरपंच संतोष हगवणे, दत्ताजी फुले, माजी सरपंच गणेश टेमगिरे, चिंतामण येळे, भानुदास टेमगिरे, पोलीस पाटील कुंडलिक येळे, माजी उपसरपंच शशिकांत कोकरे, पोपटराव शिवले, नवनाथ साळुंखे, चेअरमन हनुमंत शिवले, व्हाईस चेअरमन दौलत टेमगिरे, लाला येळे, संजय सातकर, गणेश कवितके यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान येथे नारळ, चिकू, आंबा, बॉटल बाम, चाफा, गुलमोहर यांसह आदी देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तर यावेळी बोलताना वृक्षांचे महत्व खूप सोप्या भाषेत समजून सांगताना देवाच्या समान त्यांची पण जोपासना करत पूजा केली पाहिजे, असे मत ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज यांनी मांडले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पांडुरंग टेमगिरे व आदिनाथ ढमढेरे यांनी विशेष परिश्रम घेतले असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच शशिकांत कोकरे यांनी केले तर उपसरपंच अविनाश येळे यांनी आभार मानले.

माजी आमदारांच्या आठवणींना मिळणार उजाळा…

पारोडी येथील नक्षत्र वनाचे शेजारी काही दिवसात विरंगुळा केंद्र व लहान मुलांसाठी खेळणी साहित्यांसह उद्यान उभे केले जाणार असून त्यामाध्यमातून स्व. आमदार पोपटराव कोकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी सांगितले.