माहेरच्या वतीने ऊसतोड कामगारांना उबदार कपडे वाटप करत दिवाळी साजरी…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने समाजातील दुर्लक्षित अशा ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी सण साजरा करण्यात आला असून परिसरातील शंभरहून अधिक ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांच्या समवेत पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच दिवाळी सण करुन या कामगारांना स्नेहभोजन तसेच उबदार कपडे देऊन लहान मुलांना खेळणी वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे अनाथ मुलांसाठी असलेली माहेर संस्थेत नुकतीच दिवाळी साजरी करण्यात आली असून यावेळी परिसरातील ऊसतोड कामगारांच्या कुटुंबियांना एकत्रित करुन माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या हस्ते सर्व ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना साडी तसेच उबदार कपडे आणि त्यांच्या मुलांना खेळण्यांसह खाऊचे वाटप करण्यात आले.

तसेच या सर्व ऊसतोड कामगारांसह स्नेहभोजन करुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली आहे, तर यावेळी बोलताना ज्यांच्या मुळे आपल्याला साखर व गोड पदार्थ खायला मिळतात व साखरेचा मूळ पाया अशा ऊसतोड कामगारांचा दिवस गोड व्हावा या हेतूने ऊसतोड कामगारांसह हा सण साजरा करत असल्याचे माहेर संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा लुसी कुरियन यांनी सांगितले.

यावेळी बोलताना अनाथांसह समाजातील दुर्लक्षित ऊसतोड कामगारांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून आमची दिवाळी गोड झाली असल्याची भावना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केली. तर या कार्यक्रमामुळे सर्व ऊसतोड कामगार व महिला भारावून गेल्या होत्या.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेतील रमेश दुतोंडे, मंगेश पोळ, योगेश भोर, विक्रम भुजबळ, नंदू भोर, विशाल सैदाणे, ऋशभ खडसे यांसह आदींनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे यांनी केले तर मंगेश पोळ यांनी आभार मानले.