पारगाव–पुणे एसटी सेवा पुन्हा सुरू; गणेगाव खालसा ग्रामस्थांकडून चालक–वाहकांचा सन्मान

शिरूर तालुका

शिरूर (ओमकार भोरडे): काही दिवसांपूर्वी थांबलेली पारगाव–मंगरूळ–जांबुत–मलठण–शिक्रापूर–वाघोली–पुणे ही एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिरूर आगारातून धावणारी ही गाडी आता टपालसेवाही नेणार असल्याने ती “टपाल गाडी” म्हणूनही ओळखली जाणार आहे, अशी माहिती चालक गणेश पलांडे व वाहक दत्तात्रय डोळस यांनी दिली.

या गाडीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरी–धंद्यासाठी जाणाऱ्या कामगारांना तसेच पुण्यात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. या सेवेच्या पुनर्प्रारंभासाठी पोपट फिरोदिया जांबुत यांनी विशेष प्रयत्न केले असुन गाडी सुरू झाल्याच्या आनंदानिमित्त गणेगाव खालसा ग्रामस्थांच्या वतीने चालक पलांडे व वाहक डोळस यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. या वेळी माजी पोलीस पाटील विनायक दंडवते, दत्तात्रय भोगावडे, संजय तांबे, संतोष कड, महेश पवार, वैशाली बांगर, अनिकेत बांगर, पंकज बांगर, बापू बांगर, विजय भोसले, संभाजी बांगर, सतीश बोराडे, सोमनाथ बांगर, योगेश बेंडभर, सोमनाथ चातुर, कालिदास माकर, रमेश बोराडे, दिलीप काकडे, सचिन भोगावडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.या सेवेच्या पुनर्प्रारंभामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.