बेट परीसरातील नागरिकांचा संताप शिगेला
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्र हे आजारपणाच्या, अपघाताच्या काळात लोकांना दिलासा देण्याऐवजी मृत्यूचे केंद्र ठरत चालले आहे. कारण या आरोग्य केंद्रावर नियुक्त असलेली वैद्यकीय अधिकारी फक्त नावालाच हजेरी लावून लगेच शिरूरला रवाना होते. दिवसभर रुग्णालय कर्मचार्यांच्या जीवावर रामभरोसे सुरू असते.
कर्तव्यात कसूर, शिस्तभंग व कामचुकारपणा याला तोड नसलेले हे वर्तन स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळणारे ठरत आहे. भोळ्या, गरीब व निराधार जनतेला अडचणीत टाकून डॉक्टर राजकीय,शासकिय वडिलकीच्या बळावर स्वतःचे संरक्षण करत असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.
या डॉक्टरचे वडील उच्चपदस्थ अधिकारी असून, आपल्या अपत्याला कारवाईतून वाचवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर बेट भागातील काही राजकीय मंडळींना या प्रकरणात पाठीशी उभे राहण्यास प्रवृत्त करत असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.टाकळी हाजीसह आजूबाजूच्या तब्बल नऊ ग्रामपंचायतींनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे देऊन ठोस कारवाईची मागणी केली आहे. मात्र, दुर्दैवाने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाही.
डॉक्टर दिवसभर केंद्रात न थांबता फक्त एक तास हजेरी लावतात, तरीसुद्धा ते निवासी भत्ता घेऊन सरकारला फसवत आहेत. हा भत्ता त्यांच्या पगारातून वसूल करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.परिसरातील नागरिकांचा संयम आता संपत आला आहे. नऊ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी पुढील आठ दिवसांत कारवाई न झाल्यास टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
यामुळे आगामी काळात या प्रकरणाला मोठे वळण मिळणार हे निश्चित झाले आहे. आता या प्रकरणी डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी माजी खाजदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी लक्ष घातले असून ९ ग्रामपंचायतींनी त्यांनाही कारवाई करण्यासाठी लेखी पत्र दिले आहे.अशा मुजोर डॉक्टरांविरुद्ध वरीष्ठ अधिकारी नेमकी कोणाची वाट पाहत आहेत?रुग्णांच्या जीवाशी चाललेल्या या खेळावर शासन कधी थांबवणार आणि सर्वात महत्त्वाचे भोळ्या ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्याला संरक्षण कोण देत आहे?हे प्रश्न अनुत्तरीत असून आता वरीष्ठ अधिकारी दबाव झुगारून काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
(क्रमशः)