लाखेवाडीतील नवीन सभामंडपाचा स्लॅबचा काही भाग कोसळला व प्लेअरचे बीम उखडले

शिरूर तालुका

त्वरीत काम थांबवून ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील लाखेवाडीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नव्याने सुरु असलेल्या सभामंडपाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे चालले असून त्याच्या प्लेअरचा बीम लगेच उखडला जात असून स्लॅबचा काही भाग कोसळल्याने त्यातील स्टील उघडे पडले आहे. या कामाला ठेकेदाराने पाणीच मारले नाही अशी तक्रार ग्रामस्थ करत आहे. त्यामुळे हे नित्कृष्ठ चाललेले काम त्वरीत थांबवून ठेकेदारावर कारवाई करुन चांगल्या दर्जाचे काम करण्याची मागणी लाखेवाडी येथील माजी सैनिक महादेव जगताप, रोहीदास मावळे, विक्रम मावळे यांनी केली आहे.

या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नवनाथ शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ग्रामस्थांनी तक्रारी अर्ज दिल्यास ठेकेदाराकडून चांगले काम करुन घेऊ तोपर्यंत त्या ठेकदाराचे बील ही अदा करणार नाही, अशी उत्तरे दिली आहे.

मुळातच ठेकेदारावर नियंत्रण ठेवण्याचे व सदर ठिकाणी वेळोवेळी भेट देवून चांगल्या प्रकारचे काम करुन घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचीआहे. उंटावरुन शेळया हाकण्याचे काम हा विभाग करत आहे. घटनास्थळी सार्वजनिक विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देवून नित्कृष्ठ दर्जाचे काम तात्काळ थांबवून उचित कार्यवाही करणे गरजेचे आहे.