शिरुर तालुक्यात पाटलीणबाईच्या नथीतून पाटीलच मारत आहेत तीर

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सध्या सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असुन गावात त्यामुळे शांतता भंग पावत आहे. गावातील प्रत्येक अवैध धंद्याची माहिती पोलिसांना देण्याची जबाबदारी गावातील पोलिस पाटलांची असते. शिरुर तालुक्यातील काही गावांचा अपवाद वगळता प्रत्येक गावात पोलिस पाटलांची निवड करण्यात आलेली आहे. त्यातील काही पोलिस पाटील या महिला असुन आपल्या कारभारणीच्या नथीतुन तीर मारत त्यांचे पतीच गावाच्या कारभारात ढवळाढवळ करत असल्याने चित्र काही गावात पहायला मिळत आहे.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात महिला पोलिस पाटील असुन त्यांचे पती गावातल्या कारभारात मोठया प्रमाणात ढवळाढवळ करत आहेत. तसेच या गावात मोठया प्रमाणात अवैध धंदे चालत असुन गावात गावठी दारु, तसेच किराणा मालाच्या दुकानात गुटखा आणि पेट्रोल सहजासहजी उपलब्ध होत आहे. खरंतर गावात अनेक अवैध धंदे चालु असताना याची माहिती पोलिसांना देणे याची प्राथमिक जबाबदारी या गावाच्या पोलिस पाटलांची असताना त्यांचे पतीदेव मात्र या अवैध धंद्याना पाठीशी घालत असल्याची नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

तसेच या गावातील प्रत्येक घटनेत पोलिस स्टेशनला महिला पोलिस पाटील यांच्या ऐवजी त्यांचे पतीच अनेक प्रकरणे मिटवतात. त्यामुळे नक्की पोलिस पाटील कोण आहे हेच कळायला मार्ग नाही. तसेच पोलिस पाटलांचे पती हे अनेक प्रकरणात मोठया प्रमाणात “सेटलमेंट” ही करतात. त्यामुळे त्यांच्याच आशिर्वादामुळे गावात मोठया प्रमाणात बेकायदेशीर अवैध धंदे चालु आहेत अशीही दबक्या आवाजात गावात चर्चा सुरु आहे.