कान्हूर मेसाईच्या प्रशांत रुपनेरची कुस्तीमध्ये जिल्ह्यात बाजी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारा प्रशांत संतोष रुपनेर या मल्लाची कुस्तीसाठी पुणे विभागीय पातळीवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य अनिल शिंदे व क्रीडाशिक्षक प्रकाश चव्हाण यांनी दिली आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील गारकोलवाडी ही गावच्या डोंगराळ भागात असलेली छोटीशी वाडी. धनगर समाज बहुसंख्येने असलेल्या या वाडीतील सर्वांची परिस्थिती जेमतेम, मात्र अलीकडील काळात या वाडीने शैक्षणिक गुणवत्तेत मोठी आघाडी घेतली असून दहावी व बारावीच्या वर्गात या वाडीतील मुले अनेकदा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहेत.

सध्या पोलीस भरती सह इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास एथील तरुण पिढी करत आहे. एकेकाळी पूर्ण दुर्लक्षित असणारी ही वाडी आता नवी ओळख निर्माण करत असून प्रशांत संतोष रुपनेर हा मल्ल कुस्तीक्षेत्रात लक्ष वेधून घेत आहे. कान्हूर मेसाई येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रशांत प्रथम आला होता. त्यानंतर नुकतेच जुन्नर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रशांतने एकतर्फी बाजी मारत जिल्ह्यात सतरा वर्षाखालील ४८ किलो वजनी गटात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

विभागीय पातळीवर निवड झाली असल्याने त्याची पुणे, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली ह्या जिल्ह्यातून प्रथम आलेल्या मल्लांशी लढत होणार आहे. यापूर्वी शिरुर केसरी होण्याचा बहुमान प्रशांतने मिळविला असून नुकतेच त्याने जिल्ह्यात प्राविण्य मिळवल्याने त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.