शिरुर शहर व परिसरात दरोडा टाकून धुमाकूळ घालणारी टोळी गजाआड

मुख्य बातम्या

दोन आरोपी अटकेत, पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मागील दोन महिन्यांपासून रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत दरोडा टाकून धुमाकुळ घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ऐवज जप्त केला असून ४ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आदेश लालकुश काळे (वय-२२), व सचिन संतोष काळे (वय – २३, रा. दोघेही मोहोरवडी, कोळगाव, ता. श्रीगोदा, जि. अहमदनगर अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी, बुरुंजवाडी, मुखई येथील परिसरात सतत घरफोडी व चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते. त्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणुन त्यातील आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. या प्रकरणाची जिल्हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी आदेश केले होते.

विशेष म्हणजे आरोपी हे एकाच प्रकारची बोली भाषा, कपडे, कानटोप्या वापरत होते व कोयते, चाकु व कटावणीसारखे एकाच प्रकारचे हत्यारे सोबत ठेवत होते. तसेच त्यांची गुन्हा करण्याची वेळ सुध्दा जवळपास एकसारखीच होती. त्यानुसार पोलीस पथकाला एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, वाडेगव्हाण, जि. अहमदनगर आणि कोळेगाव, जि. अहमदनगर येथे राहणारे इसमांनी सदरचे गुन्हे केले आहेत. त्यानुसार आदेश काळे व सचिन काळे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी यांच्या फरार साथिदारांसह घरफोडीचे ४ गंभीर गुन्हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, गुन्हयात चोरीस गेलेला मोबाईल फोन, गुन्हा करताना वापरलेला लोखंडी कोयता, चाकु, एक लोखंडी कटावणी, १ तोळा वजनाचे सोन्याचे शॉर्ट गंठण अशा वस्तु आरोपींकडून जप्त करण्यात आलेले आहेत. नमुद आरोपींनी गुन्हा केल्यानंतर लपून राहण्याकरीता वाडेगव्हाण या ठकाणी तात्पुरत्या स्वरूपात घर तयार केले होते व त्याच ठिकाणी ते राहत होते हे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांना सोमवार (दि १६) पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिवाजी ननावरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, मुकुंद कदम, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीन, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, सचिन घाडगे, विजय कांचन, आसिफ शेख, अजित भुजबळ, धिरज जाधव, अक्षय नवले, अमोल शेडगे, अक्षय सुपे, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, निखील रावडे, किरण निकम, अपेक्षा तावरे, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, विजय शंदे, उमेश कुतवळ, मोनिका वाघमारे तसेच श्रीगोंदा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलिस हवालदार ढवळे यांनी केली आहे.