पारोडीमध्ये आढळलेल्या जखमी कोल्ह्याला जीवदान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथील सातकर वाडी येथे आढळून आलेल्या जखमी अवस्थेतील कोल्ह्याला जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले असून सदर कोल्ह्याला पुढील उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पारोडी (ता. शिरुर) येथील सातकरवाडी मधील सुरेश सातकर यांच्या शेतात आज सकाळच्या सुमारास एक कोल्हा जखमी अवस्थेत बसला असल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी याबाबतची माहिती इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांना महिती दिली. त्यानंतर सर्पमित्र शेरखान शेख, अमोल पवार यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता त्यांना आजारी असलेला नर प्रजातीचा कोल्हा असल्याचे दिसून आले.

दरम्यान प्राणी मित्रांनी शिताफीने सदर कोल्ह्याला ताब्यात घेतले, यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य बजरंग सातकर, विवेक सातकर, नंदकुमार सातकर, पवन सातकर, संदीप सातकर यांसह आदी उपस्थित होते. त्यानंतर सदर कोल्ह्याला शिरुर वनविभागाचे वनरक्षक प्रमोद पाटील, अभिजित सातपुते यांच्या ताब्यात घेत सदर कोल्ह्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तर कोठेही जखमी पशु पक्षी आढळून आल्यास वनविभाग तसेच जवळील प्राणी मित्रांना कळवण्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.