विद्यार्थ्यांनी गरज ओळखून पावले टाकावी: उमाकांत पिंगळे

शिरूर तालुका

मुखईत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हुतात्म्यांच्या वंशजांचे मार्गदर्शन

शिक्रापूर: सध्या ऑक्सिजन मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून त्यासाठी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याने आपली गरज ओळखून आपण पावले टाकावी अन्यथा भविष्यामध्ये ऑक्सिजनच्या नळकांड्या घेऊन आपल्याला समाजामध्ये वावरावं लागेल, असे मत हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे यांनी केले.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे गुरुजी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान उमाकांत पिंगळे यांनी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे या क्रांतीकारकाचा जिवनपट विद्यार्थ्यांना उलगडून सांगित पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहीजे असा संदेश पिंगळे यांनी दिला. तसेच क्रांतिकारक मंगल पांडे यांच्या पासून सुरु झाली क्रांतिकार्याची प्रेरणा सुभाषचंद्र बोस यांच्या पर्यंत कशाप्रकारे येऊन ठेपली याचे दिलखुलास असे वर्णन केले.

तसेच देशभक्तीपर राष्ट्रगीत, वंदे मातरम ही बंगालची आपल्या भारताला मिळालेली फार मोठी देणगी असल्याचे देखील उमाकांत पिंगळे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी पिंगळे गुरुजींच्या पदस्पर्शाने आपली शाळा व आपण सर्वच खर्‍या अर्थाने धन्य झालो असल्याची भावना व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनोज धिवार यांनी केले तर किशोर गोगावले यांनी आभार मानले.