बेट भागात वळसे पाटलांनी विकासाची गंगा आणली; पोपटराव गावडे

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) भारतीय राज्य घटनेतील तरतूदीनुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये एकुण लोकसंख्येच्या ५२ टक्क्यापेक्षा आरक्षण द्यायच नाही. असे नमूद आहे. मात्र आपण ५२ टक्क्यांपर्यंत पोहचलो. आता यातून मार्ग काढला पाहिजे. यासाठी पुन्हा एकदा सरकार कामाला लागले आहे. परंतु समाजाच्या, तरूण पिढीच्या भावना तीव्र आहे. बेरोजगारी वाढत आहे. नोकरी मिळत नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नासाठी रस्त्यावर लढून चालणार नाही. जालन्यामध्ये झालेली घटना दुर्दैवी असून, घटनेचं समर्थन केले जाणार नाही. चौकशी अंती ज्याची चूक असेल, त्याला योग्य ती शिक्षा होईलच. परंतु आपण आपआपसात भांडत राहिल्याने विकासाचे प्रश्न बाजूला राहत आहे. जालन्यामध्ये झालेली घटना दुर्दैवी असून, घटनेचं समर्थन केले जाणार नाही. चौकशी अंती ज्याची चूक असेल, त्याला योग्य ती शिक्षा होईलच, असे वक्तव्य सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवार (दि ३) रोजी कवठे येमाई (ता.शिरूर) येथे विविध विकास कामांच्या भुमिपुजन व उद्घाटन समारंभ कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

 

आरक्षणा संदर्भातील केसेस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. विशेषकरून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्न, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न आहेत. मराठा आरक्षणासाठी पाठीमागच्या सरकारमध्ये सुप्रीम कोर्टात सरकारच्या वतीने मंत्रीमंडळाची कमिटी बाजू मांडत होती. त्यामध्ये मी पण होतो. त्यावेळी सुद्धा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. असेही बोलताना यावेळी ते म्हणाले. प्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाश पवार, भिमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता बहीर, कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे, सरपंच सुनिता पोकळे, उपसरपंच उत्तम जाधव,रामदास इचके , दिपक रत्नपारखी, बबन पोकळे, सुदाम इचके आदी उपस्थित होते.

 

शरद पवार माझ्या हृदयात : वळसे पाटील

राजकारणामध्ये कधीकधी वेगळी भुमिका घ्यावी लागते. त्याची काही वेगळी कारणेही असतात. परंतु त्यामुळे पवार साहेबांवरील प्रेम कमी झाले असे नाही. पवार साहेब आमच्या हृदयामध्ये आहे. ते आमचे नेते होते. नेते आहेत. आणि नेते राहतील.”

 

डॉ.सुभाष पोकळे यांच्याकडून टीकेची झोड; तर राजेंद्र गावडें कडुन सारवासारव…

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर आंबेगाव या भागात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणलेली असून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे देखील होत असलेल्या विकासकामात मोठे योगदान आहे. तुम्ही आमच्या भागाचे लोकप्रतिनिधी असून तुमच्याप्रती आमच्या मनात मोठा आदर असल्याचे गौरोद्गार माजी पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी यावेळी काढले. यावेळी बोलताना डॉ.पोकळे म्हणाले कि, बेट भागात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणात बॅनर लावले जातात; मात्र आज लावलेल्या बॅनरवरून संबंधित गावच्या सरपंचांचे फोटो नसल्याचे राजकारण घडल्याचे दिसून येते. या आधी झालेल्या निवडणुकांमधून आम्ही हजारो मतांनी निवडून आलेलो आहोत.लावलेल्या बॅनरवर “खूप काही केलय, खूप काही करायचय” अशा प्रकारची वाक्ये टाकली आहेत. मात्र दोन फोटो न टाकल्याने आमची उंची वाढण्याची अपेक्षा नाही. परंतु यामुळे वेगळा संदेश जात असून होत असलेल्या कार्यक्रमासाठी सगळी लोकं उपस्थित राहिले असते, तुम्ही जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावर बांधील राहिले असते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारे लागले गेलेले बॅनर हे कोणाच्या खर्चातून लागले गेले नाहीत तर ते कॉन्ट्रॅक्टरच्या खर्चाने लागले गेलेत असे म्हणून तुम्ही करत असलेल्या कामाच्या माध्यमातून तुमची उंची कमी करून स्वतःची उंची वाढविण्याचे काम काही मंडळी करत आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित करत डॉ.पोकळे यांनी सडकून टीका केली. मात्र कार्यक्रमासाठी लावले गेलेले बॅनर हे आम्ही स्वखर्चातून लावलेले आहेत. तर फोटो न लागल्याची चूक कधीतरी होत असते मात्र आमचा नेता आमचा अभिमान असून ते या भागात येत असताना त्यांच्या विकासाच्या कार्यक्रमाचे फ्लेक्स आमच्या पदाधिकारी यांनी लावले तर त्यात गैर नाही असे वक्तव्य राजेंद्र गावडे यांनी बोलताना व्यक्त केले.

 

सर्वसामान्यांमध्ये विकासकामांचा संभ्रम

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बेट भागाच्या दौऱ्यावर असताना विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे यांनी आपल्या विरोधकांना धारेवर धरत अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर निशाणा साधून वास्तव समोर आणण्याचे काम केले असल्याची चर्चा बेट भागात सुरु झाली आहे. तर सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त असताना निधी मिळण्याची कोणतीही संधी दिसत नाही. तर दिलीप वळसे पाटील यांनी या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी आणलेला असल्याचे जनतेने मान्य केले आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने श्रेय घेण्याचे काम काही लोक करत असून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तालुक्यात निधी वितरीत करण्यात येत आहे. मग अशा वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही कुठे उल्लेख का नाही ? मग हे श्रेय कशासाठी असा सवाल अनेकांनी चर्चेतून उपस्थित केला आहे.