Kiran Pingle

‘शिरुर तालुका डॉट कॉम’च्या उपसंपादक किरण पिंगळे यांना पुरस्कार!

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): स्व.गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच आणि रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. 4) नवरात्री उत्सवानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नऊ महिलांना सन 2022 चा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिरुर तालुक्यातील महिलांच्या समस्या सातत्याने आपल्या लेखणीद्वारे मांडणाऱ्या “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या उपसंपादक किरण पिंगळे यांना उत्कृष्ट पत्रकारीतेबद्दल नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिरुर येथील रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असुन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी या नवरात्र उत्सवाचे आयोजन केले होते. नवरात्र उत्सवात नऊ दिवस ग्रामीण भागातील महिला, युवती तसेच मुलांच्या कला- गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी लिंबू चमचा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभुषा, दांडिया स्पर्धा, गरोदर माता ओटीभरन, पाककृती स्पर्धा, होम मिनिस्टर, नृत्य स्पर्धा, नवदुर्गा पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु गेले दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे यंदा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. तसेच विविध स्पर्धाही मोठया उत्साहात पार पडल्या. मंगळवारी बक्षीस वितरण करण्यात आले.

नवरात्र उत्सव 2022 नवदुर्गा पुरस्काराचे मानकरी खालीलप्रमाणे:
1) शारदा जाधव – आदर्श गृहिणी पुरस्कार
2) सविता बोरुडे – आदर्श उद्योजिका पुरस्कार
3) किरण पिंगळे – आदर्श महीला पत्रकार पुरस्कार
4) रोहिणी बढे – आदर्श धार्मिक कार्य पुरस्कार
5) डॉ वैशाली साखरे – आदर्श वैद्यकीय पुरस्कार
6) धनश्री मोरे – आदर्श सरपंच पुरस्कार
7) शशिकला काळे – आदर्श समाजसेविका पुरस्कार,
8) उषा वेताळ – आदर्श शिक्षिका पुरस्कार
9) अ‍ॅड सारिका वाबळे – आदर्श वकील पुरस्कार अश्या विविध क्षेत्रातील नऊ कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिरूर ग्रामीणचे सरपंच नितीन बोऱ्हाडे यांनाही कार्यसम्राट सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मानाची पैठणी स्नेहा जामदार, सोन्याची नथ सीमा चव्हाण, चांदीचे पैजण राणी कर्डिले यांना देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, राष्ट्रवादी लीगल सेल चे अध्यक्ष अ‍ॅड रविंद्र खांडरे, अ‍ॅड भंडारी, दादाभाऊ वाखारे, शिरुर ग्रामीणचे सरपंच नितीन बोऱ्हाडे, माजी सरपंच तुषार दसगुडे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत कर्डिले, अमोल वर्पे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी दसगुडे, गौतम घावटे, शरद पवार, मीना गवारे, श्रुतिका झांबरे, प्रिया बिरादार, राणी शिंदे, वैशाली बांगर, रोहिणी जामदार या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राणी कर्डीले यांनी तर स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंचचे अध्यक्ष मंगेश घावटे, उपाध्यक्ष योगेश गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले.