सोशल मीडिया हे दुधारी शस्र त्याचा जपुन वापर करा; पोलिस निरीक्षक संजय जगताप 

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके):  पुर्वीच्या काळात समाजमाध्यमे नव्हती. परंतु दिवसेंदिवस सामाजिक माध्यमांचा अधिक वापर तरुणाई करत असून त्याचा दुष्परिणाम ही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून त्याचा विधायक कामांसाठी जर वापर केला तर समाजात निश्चित बदल घडवता येतो असे प्रतिपादन शिरुरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केले.

निमोणे (ता.शिरुर) येथे निमोणे आयडॉल्स या व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दहावी, बारावी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक संजय जगताप हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना जगताप पुढे म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता टिकवण्यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला हवे ते ध्येय साध्य करता येते. तसेच निमोणे आयडॉल्स ग्रुप ची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचेही संजय जगताप यांनी सांगितले.

यावेळी महिला पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील यांनी सांगितले की, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाचे मार्ग खुणावत असतात. मात्र मुलींनी जास्त हळवे न होता, चंचल न होता सावध भूमिकेत राहावे. तसेच सोशल मीडियाच्या जास्त आहारी न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास निश्चित ध्येय गाठता येईल. बाहेरच्या आभासी जगाला फसू नका असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. पुणे येथील साई अकादमीचे संदीप अरगडे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी निमोणे गावचे सरपंच संजय काळे, माजी सरपंच शाम काळे, पोलिस हवालदार राजेंद्र गोपाळे, पोलिस कॉन्स्टेबल राजू मांगडे, माजी सरपंच जिजताई दुर्गे, पोलिस पाटील इंदिरा जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. आर.काळे, सूत्रसंचालन गौतम दळवी तर आभार जगताप यांनी मानले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ,विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.