‘स्वच्छ करुया कारेगाव’ म्हणत कारेगाव ग्रामपंचायतचे सांडपाणी थेट पुणे-नगर महामार्गांवर…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असलेल्या आणि करोडो रुपयांचा महसूल मिळणाऱ्या कारेगाव (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सांडपाणी ड्रेनेज लाईन द्वारे थेट पुणे-नगर महामार्गावर येत असल्याने वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असुन पारदर्शी कारभार असणाऱ्या ग्रामपंचायतच्या ड्रेनेज लाईन द्वारे सांडपाणी थेट महामार्गावर येत असल्याने त्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका आहे.

 

कारेगाव येथे दिवसेंदिवस मोठया प्रमाणात नागरिकरण वाढले आहे. या वाढत्या नागरिकरणाला सुविधा देताना ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक होत आहे. कारण ग्रामपंचायतला एमआयडीसी कडुन येणारा कररुपी महसूल हा कमी झाला आहे. परिणामी वाढलेले नागरिकरण आणि देण्यात येणाऱ्या सुविधा यांच्यात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतला विकासकामे करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे हे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आल्याचे दिसुन येत आहे.

 

याबाबत कारेगावचे ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी सदर ठिकाणी तातडीने ग्रामपंचायत कर्मचारी पाठवून दुरुस्ती करुन घेतो. पुढील एक दोन दिवसात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ असे ते म्हणाले.