उपजिल्हाधिकारी रामदास जगताप हे सुसंस्कृत आणि आदर्श अधिकारी; निलेश लंके

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) माणसातला देव शोधा, गरीबाला न्याय द्या, वंचितांचे अश्रू पुसा आणि पुण्याचं पारडं जड करा असे प्रतिपादन निलेश लंके यांनी केले. आज (दि २) ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे आयोजित स्नेहमेळावा व यशवंत सन्मान सोहळ्यात पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार लंके बोलत होते.

 

सांसद आदर्श ग्राम जांबूतचे सुपुत्र डिजिटल सात बाराचे प्रणेते लोकप्रिय उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांना पारनेर,शिरुर,जुन्नर, आंबेगाव रहिवासी आम्ही पुणेकर मित्र परिवार तर्फे जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार लंके यांच्या शुभहस्ते जगताप यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित रामदास जगताप यांनी आपल्या आव्हानात्मक महसुली सेवाकालाचा आढावा घेत सहकार्य केलेल्यांची कृतज्ञता व्यक्त केली. महसूल विभागाच्या डिजीटल क्रांती ठरलेल्या ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून सलग सहा वर्षे केलेले काम निश्चितीच समाधान देणारे होते. त्यामुळे लाखो नागरिक दररोज लाभ घेत आहेत असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी केले

 

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक बाळासाहेब घोडे गुरुजी यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला. समाजरक्षक पोलीस कर्मचारी अधिकारी तसेच लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवून निवड झालेले अधिकारी, उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर्स, पोलिस कर्मचारी आणि शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचाही या प्रसंगी सन्मान करण्यात आला.

 

यावेळी शिरुर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, अनिता रामदास जगताप, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबाजी गावडे, जितेश सरडे, वन परिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जनता सहकारी बँकेचे माजी संचालक बिरु खोमणे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच संजय पिंगट, नवनाथ निचित, तुकाराम डफळ, महेंद्र पवार, महेंद्र मुंजाळ,अभय नांगरे, शहाजी पवार डॉ भानुदास कुलाल, रभाजी खोमणे, शिवाजी गावडे, बाबू निचित, सचिन हिलाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

समारंभाचे प्रास्ताविक संभाजी साबळे यांनी करीत उपस्थितांचे स्वागत केले, सुनिल चोरे यांनी आभार मानले व राजेंद्र शिनारे यांनी सूत्रसंचालन केले.