शिरुर शहर व आसपासचे धोकादायक खड्डे त्वरीत बुजवा; रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेची मागणी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील रामलिंग हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान आहे. तसेच शिरुर-रामलिंग रस्त्यावर अनेक खाजगी शाळा आणि लोकवस्ती आहे. परंतु या रस्त्यावर पाबळ फाटा ते रामलिंग दरम्यान मोठे मोठे खड्डे पडल्याने दुचाकी गाडयांचे अपघात होत आहे. तसेच शिरुर नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक रस्त्यावरही मोठया प्रमाणात धोकादायक खड्डे पडले असल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने तातडीने हे खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केली आहे.

 

याबाबत त्यांनी शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अनिल जाधव तसेच शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांना याबाबत निवेदन दिले आहे. पाबळ फाटा ते रामलिंग दरम्यान रस्त्याला अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडलेले आहेत. तसेच या रस्त्यावरुन सतत वाहतूक चालू असते, रामलिंग हद्दीमध्ये अनेक शाळा असुन मुलांना शाळेत सोडवणे आणि आणण्यासाठी अनेक महिला दुचाकीवर या रस्त्याने प्रवास करतात. परंतु या रस्त्यात खड्डे असल्यामुळे गाडी घसरल्याने अनेक महिलांचे किरकोळ अपघात झालेले आहेत. तसेच शिरुर नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या अनेक रस्त्याला खड्डे पडल्याने अपघात होत आहेत.

 

त्यामुळे शिरुर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिरुर नगरपालिका यांना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देऊन तातडीने हे खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, मनसेच्या महिला तालुका अध्यक्षा डॉ वैशाली साखरे, आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका बंडगर, प्रीती बनसोडे, मोनिका राठोड आदी महिला उपस्थित होत्या.

खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी नको:- राणी कर्डीले 

शिरुर-रामलिंग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत महिलांनी निवेदन दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याची दखल घेत मुरुम टाकुन खड्डे बुजविण्याचे काम चालु केले. परंतु रस्त्याला पडलेले धोकादायक खड्डे तात्पुरते न बुजवता डांबर ओतून ते व्यवस्थित बुजवावे. अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि शिरुर नगरपालिकेने त्यांच्या हद्दीत येणारे सर्व रस्ते व्यवस्थित करावे अशी मागणी राणी कर्डीले तसेच सर्व उपस्थित महिलांच्या वतीने करण्यात आली.