सुसाट ड्रायव्हिंगमुळे युवा पिढी बरबाद

शिरूर तालुका

मांडवगण फराटा (संपत कारकूड): वेगवान ड्रायव्हिंग आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून युवा पिढी रस्त्याच्या दुर्घटनेमध्ये आपले आयुष्य गमावत असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात असलयामुळे अनेक कुटुंबाला अकाली निराधार होण्याची वेळ आली आहे. नशेची सवय, गुन्हेगारीकडे होणारे अधिकचे आकर्षण यामध्ये तरुण आपले जीवन घालवीत असून देशामध्ये १ लाख तरुण आपले प्राण गमावत आहेत. शेतात काबाड कष्ट करुन रात्रंदिवस मेहनत आणि नोकरी करुन आई-वडिलांना २५ वर्ष लागतात एका तरुण मुलाला घडविण्यामध्ये परंतु वेगवान वाहन चालवून २५ मिनटात आयुष्य गमवण्याच्या घटना घडत असल्याने पालकांवर आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

आधुनिकतेचा मोठा परिणाम युवा पिढीमध्ये दिसत असून ग्रामीण भागातील शाळा, कॉलेजमध्ये संस्कृतीचा अभाव दिसून येत आहे. कॉलेज फक्त पाट्या टाकायचा विषय झाला असून शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. मोठ्या-मोठ्या इमारती उभारुन उभ्या केलेल्या शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, अकादमीमध्ये संस्कृतीचे शिक्षण देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. केवळ पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी संस्कृती दिवसेंदिवस लोप पावताना दिसत आहे. जी काही थोडीफार टिकून आहे, तीही अत्यंत वेगाने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संस्कृती नसली तर नुसते शिक्षण देऊन काय उपयोग. गुरुकुल शाळा उभ्या करुन हा ऱ्हास थांबवणे शक्य होईल का…?