शिरुर तालुक्यात एका टोळक्याकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण

क्राईम

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत कर्मचारी मोजणीदाराला काही विचारपूस करत असताना ५ जणांच्या टोळक्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तुकाराम रामभाऊ भुजबळ, संजय तुकाराम भुजबळ, शरद तुकाराम भुजबळ, दिपाली संजय भुजबळ, सुषमा राजाराम भुजबळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष भुजबळ यांच्या भावकीतील व्यक्तींनी जमिनीची खाजगी मोजणी आणलेली होती, सदर जमिनीची मोजणी सुरु असताना सुभाष भुजबळ खाजगी मोजणीदाराशी काही विचारपूस करत होते. दरम्यान सुभाष मोजणीदाराशी विचारपूस करत असताना संजय भुजबळ व शरद भुजबळ सदर ठिकाणी आले त्यांनी सुभाष यास लोखंडी गज तसेच दगडाने मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी सुभाषचे आई व वडील भांडणे सोडवण्यास आले असता तुकाराम भुजबळ, सुषमा भुजबळ, दिपाली भुजबळ यांनी सुभाषसह त्याच्या आई वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली.

सदर घटनेत सुभाष भुजबळच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून याबाबत सुभाष ज्ञानेश्वर भुजबळ (वय ३७) रा. मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी तुकाराम रामभाऊ भुजबळ, संजय तुकाराम भुजबळ, शरद तुकाराम भुजबळ, दिपाली संजय भुजबळ, सुषमा राजाराम भुजबळ सर्व रा. २४ वा मैल शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.