सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव्ह शिरुर आयोजित रक्तदान शिबिरात 121 बाटल्या रक्त संकलित 

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र, कामगार तसेच दुर्ग दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव शिरुर यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सोमवार (दि 1) मे रोजी 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दुर्गप्रेमी असणाऱ्या या संघटनांच्या तरुणांनी शिरुर येथे आयोजित केलेले हे सातवे रक्तदान शिबिर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रक्तदान या शिबिरास सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्रात गड, किल्ले संवर्धनासाठी झटणाऱ्या तरुणांच्या आवाहनाला तरुणाईने चांगला प्रतिसाद दिला. यावेळी शिरुर येथील तरुणांनी तसेच अनेक महिलांनी रक्तदान केले. अवघ्या सहा तासांत 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिरुर शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया यांनी ६५ व्या वेळी रक्तदान केले. तसेच त्यांचे चिरंजीव मित खाबिया यांनी वडिलांचा आदर्श घेतला असून त्याचीही रक्तदानाची हि आठवी वेळ होती. त्यांच्या या योगदानाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली तसेच कामगारांप्रती सदभावना व्यक्त करण्यासाठी रक्तदान या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे दुर्गसेवकांनी सांगितले.

वाचन संस्कृतीला बळ मिळावे या हेतूने आयोजकांतर्फे रक्तदात्यांना प्रमाणपत्रा बरोबरच लेखक रवी मोरे लिखित संताजी घोरपडे ममलकतमदार या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव शिरूर सारख्या तरुणांचा भरणा असणाऱ्या संघटना रक्तदान शिबिरांच्या आयोजनातून जपत असलेली सामाजिक बांधिलकी पाहून लेखक मोरे देखील प्रभावित झाले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांचे कौतुक केले आहे.

यावेळी शिवप्रेमी कुणाल काळे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, जिजामाता सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मनीषा कालेवार, मानव विकासच्या प्रिया बिरादार, सुवर्णा सोनवणे तसेच अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या. यावेळी रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, डॉ शिल्पा घोडे, आशा पाचंगे यांनीही रक्तदान केले.