शिक्रापुरातील मोबाईल दुकानदाराचा प्रामाणिकपणा

शिरूर तालुका

दागिने व रकमेसह सापडलेली पर्स पोलिसाच्या माध्यमातून परत

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या अनेक ठिकाणी प्रामाणिकपणा नाहीसा होत असताना दुकानाबाहेर सापडलेली दागिने व रोख रकमेसह काही साहित्य असलेली पर्स पोलिसांच्या माध्यमातून मूळ मालकाला परत केली असल्याने मोबाईल दुकानदाराच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सार्थक मोबाईल शॉपीचे मालक कमलाकर गारगोटे हे सकाळच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाबाहेर एक पर्स दिसली. त्यावेळी त्यांनी बराच वेळ वाट पाहिली असता कोणी आले नाही. त्यामुळे त्यांनी पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये काही पैसे व दागिन्यांसह काही साहित्य असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे गारगोटे यांनी तातडीने शिक्रापूर पोलीस स्टेशनला जात पर्स पोलिसांकडे दिली दरम्यान पोलीस नीम अतुल पखाले, अविनाश पठारे यांनी पर्समधील कागद पत्रांच्या मदतीने पर्स असलेल्या महिलेचे पती नितीन जाधव यांना फोन करुन माहिती दिली, दुपारच्या जाधव हे पोलीस स्टेशन येथे आले, त्यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार, भास्कर बुधवंत, मिलिंद देवरे, जयराज देवकर, अमोल रासकर यांनी जाधव यांच्या ताब्यात पर्स सुपूर्त केली.

यावेळी आपल्या पत्नीच्या पर्स मधील दागिने, पैसे व अन्य साहित्य पाहून जाधव यांना आनंद झाला त्यामुळे त्यांनी मोबाईल शॉपीचे मालक कमलाकर गारगोटे यांचे आभार मानले, तर कमलाकर गारगोटे यांचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद असल्याचे मत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार यांनी व्यक्त केले.