कान्हूर मेसाई परिसरात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दोन दिवसांपुर्वी कान्हुर मेसाई, मिडगुलवाडी, खैरेनगर, खैरेमळा, चिंचोली, शास्ताबाद येथे अवकाळी पावसाने कांदा पिकामध्ये पाणी साठल्याने कांदा पिकाच्या मुळ्या सडल्याने मर रोग होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या हक्काच्या पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असुन तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कांदा पिकाबरोबरच ज्वारी आणि गहू या पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने ज्वारीचे पिक भुईसपाट झाल्याने जास्त नुकसान झाले असुन ज्वारीचे उत्पादन घटणार आहे. कांदा,ज्वारी, आणि गहू ही वर्षातून एकदा घेतली जाणारी पिके असुन यावरच शेतक-यांचा उदरनिर्वाह चालतो. एकीकडे वाढत असलेल्या रासायनिक खत तसेच औषधांच्या किंमती आणि दुसरीकडे निसर्गाचा अनियमितपणा आणि सरकारचे बदलते आयात-निर्यात तसेच हमीभाव धोरण त्यामुळे दिवसेंदिवस शेती हा व्यवसाय धोक्यात आला आहे.

या अवकाळी पाऊसामुळे कांदा लागवडीसाठी आलेली रोपे भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सर्वाधिक फटका कांदा,बटाटा, कोथिंबीर, मेथी, शेपू यांसारख्या भाजीपाला पिकांना बसला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे भाजीपाला पिके सडून जाण्याची शक्यता आहे

कान्हूर मेसाई हा भाग दुष्काळी असल्यामुळे, या ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी.

बबन शिंदे (जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट)

शासनाने अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी. तसेच कान्हूर मेसाई ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांनी याची लवकरात लवकर याची दखल घेऊन संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक ,कृषी अधिकारी यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याची शासनामार्फत भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. मागच्या वर्षीचे अजूनही अर्ध्यापेक्षाही जास्त शेतकरी अनुदानपासून वंचित आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याची कार्यवाही होणे गरजेचे आहे.

भास्कर पुंडे (जिल्हा सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ)