शिरुर तालुक्यात युवकाच्या दक्षतेमुळे कुत्र्याच्या तावडीतून कासवाला जीवदान…

शिरूर तालुका
रांजणगाव गणपती (तेजस फडके): कोंढापुरी (ता. शिरुर) एका कासवावर कुत्रा हल्ला करत असताना एका युवकाच्या दक्षतेमुळे त्या कासवाला जीवदान देण्यात यश आले असून सदर कासवाला पाणी मित्रांनी ताब्यात घेत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथे एका कासवावर कुत्रा हल्ला करत असल्याचे सयाजीराजे गायकवाड यांना दिसून आले यावेळी त्यांनी तेथील कुत्र्याला बाजूला करत कासवाला कुत्र्याच्या तावडीतून मुक्त केले. याबाबतची माहिती अशोक गायकवाड यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी दिली.

त्यांनतर सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर, अर्शलान शेख यांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता तेथे भारतीय मृदू कवचाचे गोड्या पाण्यातील कासव आढळून आले यावेळी अशोक गायकवाड, श्रीकांत गायकवाड, धोंडीबा दरवडे, सयाजीराजे गायकवाड यांसह आदि उपस्थित होते.

दरम्यान प्राणीमित्रांनी सयाजीराजे गायकवाड यांच्या धाडसाचे कौतुक केले असून यावेळी बोलताना आपल्या परिसरातील वन्यजीव सध्या कमी होत चाललेले असून वन्य जीव तसेच पशु पक्षांच्या रक्षणासाठी नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे मत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी व्यक्त केले. तर या कासवाबाबतची माहिती शिरुर वनविभागाचे वनरक्षक प्रमोद पाटील हातोंडे यांना देत सदर कासवाला निसर्गात मुक्त करण्यात आले आहे.