रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त (दि 15) रोजी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतच्या वतीने गावांमध्ये वृक्षारोपण तसेच पर्यावरण संवर्धन हा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावामध्ये ग्रामपंचायत साठवणूक गृहासमोरील मोकळ्या जागेत आणि मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला, गावठाण, शेळकेवस्ती, खेडकरवस्ती, फंडवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूल अशा एकूण सहा शाळांमध्ये विद्यार्थी व मुख्याध्यापकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शिरुर तालुक्यामध्ये शेकडो कंपन्या वस्तु व सेवांचे उत्पादन करतात. या कंपन्यांमध्ये हवा, पाणी, माती, आवाज यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्तींसह, पशु, पक्षी ,वृक्ष, जीव, जंतू या सर्वांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. शिरुर तालुक्यात औद्योगिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर तंबाखू युक्त पदार्थांच्या उत्पादनामुळे तसेच घातक कचरा उत्सर्जनामुळे कर्करोगाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
त्यामुळे पर्यावरणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याने सभोवतालच्या परिसरात तापमान वाढीची समस्या समोर आली आहे. त्यामुळे या सर्व समस्यावर पर्याय म्हणुन जागतिक पर्यावरण दिन तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 87 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरुर विकास गटामध्ये पंचायत समिती, वनपरिक्षेत्र, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचे काम सर्व ग्रामपंचायतींनी हाती घेतले आहे. यात मोठ्या प्रमाणावर जंगली व फळांच्या वृक्षांची लागवड कार्यक्रम संपूर्ण महिनाभर चालणार असुन यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशन (RIA) यांच्या विद्यमान अध्यक्षांकडे ट्रीगार्ड ,ठिबक, सोलर मोटर यांच्या मदतीसाठी पत्राद्वारे आव्हान केले आहे.
सदर लागवड केलेल्या वृक्षांच्या वर्षभर गवत काढणे, पाणी घालने यासाठी बिहार पॅटर्न (नरेगा) च्या माध्यमातून काही सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार असुन वृक्षमित्र, पर्यावरण प्रेमी यांनी पंचायत समिती कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवाजी खेडकर यांनी केले आहे.
यावेळी रांजणगावचे ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख, सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच संपत खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर, ग्रामपंचायत सदस्य आकाश बत्ते,विलास अडसूळ, सुजाता लांडे, सुप्रिया लांडे, स्वाती शेळके,अनिता बांदल,महागणपती इंग्लिश मिडीयम शाळेचे मुख्याध्यापक विकास शेळके सर,सामाजिक कार्यकर्त्या संगिता भूजबळ, सोनबा खेडकर, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.