विठ्ठलवाडीत भरला बावीस वर्षांनी पुन्हा दहावीचा वर्ग

शिरूर तालुका

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या पाण्याच्या समस्येसाठी बोअरवेल

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयातील सन २००१ साली परीक्षा देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला असल्याने विठ्ठलवाडीत 22 वर्षांनी 10 वी चा वर्ग भरल्याचे दिसून आले आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर येथे तब्बल 22 वर्षांनी सर्व वर्गमित्र एकत्र आल्याने आगळा वेगळा आनंद निर्माण झाला होता. यावेळी विद्यार्थ्यांचे तत्कालीन शिक्षक देखील उपलब्ध असताना आपले विद्यार्थी देशसेवेत, माजी सैनिक, व्यावसायिक, कामगार, शेतकरी, पुढारी, गृहिणी व कला कौशल्य आदी क्षेत्रात कार्यरत असल्याचे पाहून शिक्षकांना देखील समाधान वाटले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेकांना जुन्या आठवणींमुळे अश्रू अनावर झाले.

माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू तसेच विद्यालयाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 51 हजार रुपये किमतीचा बोअरवेल खोदून आणि पंपसेट बसवून दिला यावेळी शाळेचे सेवानिवृत्त तसेच आजी माजी शिक्षक, मुख्याध्यापक तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते, तर सदर माजी विद्यार्थी मेळाव्यात ४७ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते तर सामुदायिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.