शिक्रापूरसह परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) सह जवळील कोरेगाव भिमा, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, पाबळ यांसह आदी गावांमध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठन करत एकमेकांना शुभेच्छा देत एक आगळ्या वेगळ्या उत्साहात मुस्लिम धर्मियांचा मुख्य व पवित्र असा रमजान ईद सण साजरा करण्यात आला असून मुस्लिम बांधवांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) सह परिसरातील कोरेगाव भिमा, तळेगाव ढमढेरे, पाबळ अन्य मोठमोठ्या गावांमध्ये नमाज पठण साठी असणारे ईदगाह व मशीद असलेल्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचे रमजान ईद निमित्ताने सामुहिक नमाज पठन करण्यात आले. अनेक ठिकाणी इदगाह व मशिदीच्या ठिकाणी गावातील नेमणूक असलेल्या मौलानाच्या नेतृत्वाखाली सामुहिक नमाज पठन करण्यात आले. शिक्रापूर मध्ये वाढत्या नागरीकरणामुळे येथील मुलाणी मस्जिद ट्रस्टच्या पुणे महामार्गालगत असलेल्या जागेमध्ये गावातील इनामदार परिवारांच्या पुढाकाराने सदर जागेत ईदगाह उभारून दोन बैठकी (जमात) घेत नमाज पठन करण्यात आले आहे. यावेळी सुमारे दीड ते दोन हजार मुस्लिम बांधवांनी शिक्रापूर येथे शांततेत व सामुहिक नमाज पठन केले.

शिक्रापूर सह परिसरातील सर्व भागांमध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशन च्या वतीने सदर कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या नियंत्रणाखाली पोलीस बंदोबस्थ ठेवण्यात आलेला होता. नमाज पठन नंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेट देत रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या. या नंतर गावातील प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरी रमजान ईद निमित्त सिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी नागरिकांना कोरोणातून पूर्णपणे मुक्ती मिळाली असताना सर्व सण मोठ्या उत्साहात होत असल्याने मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सण चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आलेला असून परिसरातील सर्व भागांमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली आहे.