बंद घर फोडून अज्ञात चोरट्याचा धुमाकूळ

क्राईम शिरूर तालुका

कवठे येमाई येथे १७,७६० रुपयांचा ऐवज लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे एका बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने प्रापंचिक साहित्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी विष्णुदास गोपाल मुखेकर (वय ६६), निवृत्त पोस्ट मास्टर, हे मुळचे कवठेयेमाईचे रहिवासी असून सध्या नवी मुंबईतील सानपाडा येथे वास्तव्यास आहेत. आपल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे समजताच त्यांनी घराची पाहणी करत तातडीने शिरूर पोलिस ठाण्यात धाव घेतली.फिर्यादी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ वा. घर बंद करून बाहेर गेले होते. त्यानंतर १९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. ६ डिसेंबर रोजी दुपारी १.२० वा. फिर्यादी घरी परतल्यावर चोरीचा संपूर्ण प्रकार उघड झाला.

या चोरीमध्ये सॅमसंग कंपनीचा एलसीडी टीव्ही — किं. ५,००० रु.,महाराजा कंपनीचा मिक्सर — किं. १,००० रु.,पाच साधे पांढरे शर्ट व दोन काळ्या रंगाच्या पॅन्ट — किं. ४,८०० रु.,सहा सहावारी साड्या — किं. ६,००० रु.,निळ्या रंगाची रेगझिनची गळ्यात अडकवायची बॅग — किं. ५०० रु.,एक ब्लॅंकेट व एक बेडशीट — किं. १,२०० रु. असा एकूण १७,७६० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कसाच्या तरी साहाय्याने उचकटून चोरी केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पो.हवा.अरुण उबाळे हे करीत आहेत. स्थानिक परिसरातील हालचाली, संशयितांच्या माहितीचा मागोवा आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे तपास जलदगतीने सुरू असून, चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे.