वढू- तुळापूरच्या स्मारकाच्या आराखड्याचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) सह तुळापूर ग्रामस्थांना विश्वासात घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा अद्यावत करण्याचे काम सुरू असून नुकतेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी पुणे यांचे दालनात संपन्न झाल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

शिरुर लोकसभा मतदार संघातील विविध कामे व प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात (दि. १५) सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीतील शिरूर लोकसभेतील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्याकरिता माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसएमडब्ल्यू ड्वेलिंग पुणे संस्थेने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्याचे प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण केले होते.

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकस्थळ हे पर्यटन क्षेत्र न वाटता तीर्थक्षेत्र असावे, येणाऱ्या प्रत्येकाला महाराजांच्या संघर्षाची व शिवकालीन कालखंडाची पावलोपावली प्रचिती येऊन राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, महाराजांची बलिदान भूमी असल्याने मौजमजेची जागा न वाटता इतिहास तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन भव्य ऐतिहासिक आराखडा राबवावा अशा स्वरुपाच्या सूचना वढू तूळापूर ग्रामस्थ शिष्टमंडळ व धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीने केल्या. तसेच वढू तुळापूरला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण होऊन आपटीजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम व्हावे, गायरान जागा ताब्यात घेताना ग्रामपंचायतीला प्रशासनाने विश्वासात घ्यावे, वढू स्मारका साठीच्या जागेतील अडचणी दूर करुन निधी वाढवून मिळावा यादेखील मागण्या ग्रामस्थांनी केल्या होत्या.

पुढील आठ दिवसात ग्रामस्थांनी आराखड्यात समाविष्ट करावयाच्या बाबी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग व माझ्याकडे द्याव्यात जेणेकरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सादरीकरण वेळी महत्त्वाच्या बाबींचा आराखड्यात समावेश होऊ शकेल असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

सदर बैठकीस बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समिती वढू बुद्रुकचे मिलिंद एकबोटे, सचिन भंडारे, तुळापूरचे माजी सरपंच माऊली शिवले, अमोल शिवले यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच वढू बुद्रुक व तुळापूरला जोडणारे रस्ते व पुलांची कामे स्वतंत्रपणे अर्थसंकल्पातून हाती घेण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी करणार असल्याचे देखील यावेळी बाळासाहेबांची शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सांगितले.