शिरुर तालुक्यात रंगू लागले साखर कारखान्यांचे राजकारण

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स हा साखर कारखाना बेकायदेशीरपणे सुरु असल्याने या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली असता शिरुर तालुक्यातील अनेक शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या व्यंकटेशकृपा कारखान्याबाबत राजकारण कोणी करु नये तसेच कारखाना आम्ही बंद पडू देणार नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील यावेळी अनेक शेतकऱ्यांनी दिला आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स या कारखान्यावर बेकायदेशीर असल्याचा आरोप केले जात असताना आज शिरुर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी आक्रमक होत पत्रकार परिषद घेतली, यावेळी पिंपळे जगतापचे माजी सरपंच शिवाजी जगताप, निलेश जगताप, जातेगाव बुद्रुकचे माजी सरपंच सुरेश इंगवले, नवनाथ शिवले, संभाजी धुमाळ, गणेश शेळके, शिवाजी भोंडवे, आण्णासाहेब मांजरे, हनुमंत पवार, नानासाहेब इंगवले, अंकुश उमाप, सोमाजी क्षिरसागर, राजेंद्र गव्हाणे, साहेबराव भंडारे यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना कारखान्याचा त्रास शेजारील लोकांना होत नसून लांब राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कसा होत आहे, कारखान्यातून प्रक्रिया केल्या जाणाऱ्या पाण्याचा आम्हाला शेतीला फायदा होत आहे, तर एका शेतकऱ्याने जातेगाव बुद्रुकचे नाव कोठेही नसताना कारखान्यामुळे आज जातेगाव बुद्रुकचे नाव जगाच्या नकाशावर गेले असल्याचे सांगितले.

यापूर्वी विरोधकांचा घोडगंगा कारखान्यावर डोळा होता त्यात काही साध्य झाले नाही म्हणून आता शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या व्यंकटेशकृपा च्या मागे लागून घोडगंगेचा राग इकडे काढला जात आहे, मात्र शेतकरी हा कारखाना बंद पडू देणार नाही. कारखान्यावर आरोपी करणाऱ्यांचा ऊस आहे का असा देखील सवाल काही शेतकऱ्यांनी केला असून त्यांनी एखादा कारखाना अथवा संस्था काढून ती संस्था चालवून दाखवावी असा देखील इशारा यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी विरोधकांना दिला आहे.

यापूर्वी आपल्या राज्यातील उद्योग बाहेर नेण्याचे काम भाजपाने केलेले असून त्याच धर्तीवर भाजपाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला साखर कारखाना बंद करण्याच्या मागे लागल्याचा आरोप नवनाथ शिवले यांनी केला आहे.

शिरुर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखाना निवडणुकीनंतर शिरुर तालुक्यात कारखान्यावरील राजकारण थंड होईल असे वाटत असताना आता पुन्हा व्यंकटेश कृपा कारखान्यामुळे शिरुर तालुक्यातील राजकारण पुन्हा पेटत राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.