Ghodganga

घोडगंगाच्या निवडणुकीत मतदार भाकरी फिरवणार का…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.या निवडणुकीसाठी एकूण १३२ अर्ज वैध झाले आहेत.गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे निवडणुक लांबणीवर पडली होती.या वर्षी होत असलेली निवडणूक दोन्ही बाजूने ताकत लावल्याने रंगतदार होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

घोडगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण १९ हजार ३५१ सभासद आहेत. घोडगंगा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ६ गट असून त्यात न्हावरे,शिरूर ग्रामीण, तळेगाव ढमढेरे, मांडवगण फराटा, वडगाव रासाई, इनामगाव या गटाचा समावेश होतो. यापैकी तळेगाव ढमढेरे हा गट सर्वात मोठा असून या गटात ३५७६ मतदार सभासद आहेत. त्यापाठोपाठ शिरुर -३४९८ सभासद,न्हावरे -३३३१सभासद,वडगांव रासाई -३२४४ सभासद,इनामगांव ३१४७ सभासद, मांडवगण फराटा- २५५५ सभासद तर ‘ब’ वर्ग मतदार यादी २२ सभासद असे एकूण १९ हजार ३५१ मतदान सभासद आहेत.

unique international school
unique international school

या निवडणुकीत अनेक प्रस्थापित पुढाऱ्यांनी निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. या अर्जाची छाननी पार पडली असून यात काका साहेब खळदकर व अन्य तीन उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख १८ जुलै असून कोणत्या गटात कोण माघार घेणार यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.आताच्या निवडणुकीत मांडवगण फराटा गटातून १४ अर्ज,तळेगाव ढमढेरे २४,न्हावरे १५,वडगाव रासाई १२, इनामगाव ११, शिरुर १३ अर्ज वैध झाले आहेत. संस्था ब गट २ अर्ज,अनुसूचित जाती जमाती -४, महिला प्रतिनिधी १६,भटक्या विमुक्त जाती जमाती ११, इतर मागास प्रवर्ग १० अर्ज असे एकूण १३२ अर्ज या निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत.

या निवडणुकीसाठी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल असून दुसऱ्या बाजूने भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे व इतर सर्वपक्षीय मिळून घोडगंगा किसान क्रांती या पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. याअगोदर माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात होती. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादा पाटील फराटे सुधीर फराटे, काका खळदकर, ॲड सुरेश पलांडे, महेश ढमढेरे, आबासाहेब गव्हाणे,अरविंद ढमढेरे, आबासाहेब सोनवणे, राजेंद्र कोरेकर, राहुल पाचर्णे यांनी घोडगंगा किसान क्रांती पॅनलची या निवडणुकीत मोट बांधली आहे.त्यामुळे सत्ताधारी गटाला ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी जाणार नसल्याचे बोलले जात आहे.

एका बाजूने सर्व तालुक्यातील नेते आमदार अशोक पवार यांच्या विरोधात एकवटलेले असताना आमदार पवार हे मात्र या निवडणुकीत तरुणांना संधी देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा सामना पहायला मिळाल्यास नवल वाटायला नको. निवडणुकीला सुरवात झाल्यापासून घोडगंगा किसान क्रांती पॅनल कडून सातत्याने कारखान्याच्या कारभारावर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार नेमके सत्ताधारी गटाला कौल देणार की सत्तापालट करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरु असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे मात्र नक्की. यावर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी दोन्ही बाजूने जोरदार फिल्डिग लावल्याचे पाहायला मिळत आहे. १८ जुलै रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून नक्की उमेदवाराची माळ कुणाच्या गळ्यात पडते आणि कुणाच्या पदरी निराशा येते हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.त्याचबरोबर या निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्याचा गट कोणत्या गटात सामील होऊन निवडणुकीला सामोरे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

तळेगाव ढमढेरे गटातून सुरेश पलांडे, महेश ढमढेरे, मधुकर दोरगे, अरविंद ढमढेरे, विश्वास कोहकडे,आबासाहेब गव्हाणे, राहुल गवारी, संदीप गुंदेचा, प्रकाश पवार या दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर शिरुर गटातून माजी आमदार बाबुराव पाचर्णे, राजेंद्र जगदाळे, राजेंद्र गावडे, पांडुरंग थोरात, सवित्रा थोरात यांनी अर्ज दाखल केले आहेत. मांडवगण फराटा गटातून दादा पाटील फराटे, संभाजी फराटे, बाळासाहेब फराटे, सोनवणे भाऊसाहेब, शंकर फराटे, अरुण नागवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

इनामगाव गटातून नरेंद्र माने,सचिन मचाले,तुकाराम निंबाळकर, सुदाम शिंदे,तात्या घाडगे यांनी अर्ज दाखल केले. न्हावरे गटातून भाऊसाहेब भोसले, शरद निंबाळकर, सागर निंबाळकर, अशोक संकपाळ, संजय काळे, पांडुरंग दुर्गे या दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.वडगाव रासाई गटातून आमदार अशोक पवार, सुजाता पवार, उमेश साठे, ठकसेन ढवळे, वीरेंद्र शेलार, शरद साठे, प्रशांत होळकर, कमलाकर साठे, सुभाष शेलार, ऋषिराज पवार, सुरेश ढवळे, सुभाष शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महिला प्रवर्गातून सुजाता पवार, सीमा फराटे, प्रतिभा बोत्रे, सुवर्णा फराटे, लतिका वराळे, छाया फराटे, उज्वला शेलार, यमुना वाळुंज, मंगल कोंडे यांनी अर्ज दाखल केले आहेत.