सांगलीच्या काजल सरगरची वजनदार कामगिरी

इतर देश

महाराष्ट्राला वेटलिफ्टिंगमध्ये पहिले सुवर्ण पदक

पंचकुला (हरियाना): खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने आज सुवर्ण कामगिरी केली. वेटलिफ्टिंग आणि योगा (पारंपरिक), सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही सुवर्ण पदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सरगरने महाराष्ट्राला सकाळीच पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले आहे.

ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राने गाजवला. वेटलिफ्टिंगमध्ये काजल सरगरने सुवर्ण कामगिरी महाराष्ट्रासाठी शुभदायी ठरली. ती मूळ सांगलीची कन्या आहे. काजलने ४० किलो वजनगटात हे नैपुण्य दाखवले. या गटात तिने ११३ किलो वजन उचलले. स्नॅच या प्रकारात ५० आणि क्लिन अँड जर्क प्रकारात ६३ किलो वजन उचलले. काजलचा भाऊ संकेत सरगर हाही खेळाडू आहे. तो सध्या इंडिया कॅम्पमध्ये आहे. कॉमनवेल्थ गेमसाठी त्याची निवड झाली आहे. ती मयूर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या स्पर्धेत तिला प्रशिक्षक उज्ज्वला माने व गीता सिंहासने यांचे मार्गदर्शन लाभले.

टपरी चालकाच्या मुलीचे यश
काजल ही सांगलीच्या संजयनगर भागातील रहिवासी आहे. तिच्या वडिलांची चहाची टपरी आहे. प्रतिकूल परिस्थितीत सराव करुन तिने हे यश मिळवले आहे. महाराष्ट्र सरकारने सुवर्ण पदकासाठी जाहीर केलेले ३ लाख रुपये माझ्यासाठी अनमोल आहेत. त्या पैशांचा वापर माझ्या डाएटसाठी होईल. या यशाने आत्मविश्वास वाढला आहे. यापुढे महाराष्ट्र, देशासाठी आणखी पदक मिळवून द्यायची आहेत, अशी प्रतिक्रिया काजल सरगरने पदकानंतर दिली.