शिरुर तालुक्यात जनावरांना होऊ लागला लंपी आजाराचा शिरकाव

इतर शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनावरांमधील लंपी या संसर्गजन्य आजाराची लागण होत असताना पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये काही प्रमाणात जनावरे बाधित सापडलेली असताना शिरुर तालुक्यात देखील लंपी सदृश जनावरे आढळून आलेली असल्याने शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे.

शिरुर तालुक्यात जनावरांची संख्या जास्त असून अनेकदा जनावरांना वेगवेगळ्या आजारांची लागण झाल्याचे समोर आलेले असताना सध्या बुधे वस्ती येथे 3 जनावरे लंपी सदृश आढळून आलेली असल्याने शिक्रापूर सह परिसरात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोनाने पाठ फिरवलेली असताना आता शेतकऱ्यांच्या जनावरांचा आजार उद्भवला आहे.

सदर आजार देशी जनावरांसह संकरीत जनावरांना देखील होत असल्याने शेतकरी सुद्धा हवालदिल होऊ लागले आहेत. मात्र शेतकऱ्यांनी जनावरांमध्ये काही बदल तसेच आजारांची लक्षणे जाणवल्यास तातडीने पशु वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन पशु संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी गोठा व परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे: डॉ. प्रदीप खंडागळे

सध्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून आपल्या परिसरात देखील लंपी सदृश जनावरे आढळून येत असल्याने शेतकऱ्यांनी गोठा व परिसर स्वच्छ ठेवत त्या ठिकाणी माश्या होणार नाहीत याची काळजी घेत सध्या बाजारातून जनावरे आणणे टाळावे असे पशुधनविकास अधिकारी डॉ. प्रदीप खंडागळे यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषद पशु संवर्धन विभाग, पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली लंपी सारख्या चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जनावरांना उपचार मिळण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. ग्रामपंचायतने गोठ्यात फवारणी करण्यासाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.