शेअर बाजार निर्देशांकात भरीव वाढ…

इतर

मुंबई: डॉलर वधारत असल्यामुळे आणि रुपया घसरत असल्यामुळे गेल्या ६ महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्याच खालच्या पातळीवर आले आहेत. आता मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूक दारांनी विक्री थांबवून काही प्रमाणात खरेदी सुरु केल्याचे वातावरण बाजारात आहे. काल या गुंतवणूकदारांनी 309 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

आज शेअर बाजारात बरीच खरेदी झाल्यामुळे ४ दिवसानंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक काही प्रमाणात वाढण्यास मदत झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 344 अंकांनी वाढून 53,760 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 110 अंकांनी म्हणजे 0.69 टक्‍क्‍यांनी वाढून 16,049 अंकावर बंद झाला.

unique international school
unique international school

जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येण्याबरोबरच परकीय गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू केल्यामुळे निर्देशांक वाढत असल्याचे दिसून येते. हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, मारुती, लार्सन अँड ट्यूबरो, एचडीएफसी, महिंद्रा, नेस्ले, भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र टाटा स्टील, पावर ग्रीड, एचसीएल टेक्‍नॉलॉजी, विप्रो, डॉक्‍टर रेड्डीज, ऍक्‍सिस बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा आजही सहन करावा लागला.

दक्षिण कोरिया, जपान येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतातील गुंतवणूकदारानी काही प्रमाणात खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कच्च्या तेलाचे दर घसरत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला लाभ होण्याची शक्‍यता बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे. मात्र लवकरच जाहीर होणाऱ्या फेडरल रिझर्वच्या पतधोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून जमेची बाजू म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री कमी केली आहे. एवढेच नाही तर काल या गुंतवणूकदारानी 339 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची माहिती शेअर बाजारानी जारी केली आहे. त्यामुळे आता शेअर बाजाराचे निर्देशांक आगामी काळात वाढतील, असे वातावरण निर्माण झाले असल्याचे काही ब्रोकर्सनी सांगितले.