पुणे: शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव गणातून राष्ट्रवादीच्या उमेदवार व माजी सरपंच निर्मला नवले यांचा अवघ्या ३०० मतांनी पराभव झाला. सोशल मीडियावर ‘रीलस्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवले यांच्या पराभवाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान, या निकालानंतर नवले यांनी स्वतः प्रतिक्रिया देत पराभवाची कारणे मांडली असून मनातील खदखदही व्यक्त केली आहे.
Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…
पराभवाबाबत बोलताना नवले म्हणाल्या, “माझा ३०० मतांनी झालेला पराभव माझ्यासाठी अनपेक्षित होता. निवडणुकीत पैशांचा अतिवापर झाला. तरीदेखील ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले, त्यांची मी ऋणी आहे. या निवडणुकीत पैसा जिंकला, बोगस मतदार जिंकले आणि माणूस हरला, हे कटू वास्तव आहे.”त्यांनी काही मतदारांवरही टीका करत म्हटले की, “माझ्या गणातील काही मतदार पैशांसाठी पुढील पाच वर्षांसाठी विकले गेले. ही भावना अत्यंत वेदनादायी आहे.”
नवले यांनी विरोधकांवर गंभीर आरोपही केले. “निवडणुकीत तरुण कार्यकर्ते अधिक काळ सक्रिय राहावेत, रात्रभर जागे राहावेत यासाठी दारूसोबत ड्रग्जचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. ३० ते ४० तरुण ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. याचे गंभीर परिणाम येत्या काळात दिसून येतील,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
View this post on Instagram
आजच्या राजकारणाच्या स्थितीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “विकासकामं, लोकांची सुख-दु:खं, वैयक्तिक प्रश्न, पक्षनिष्ठा किंवा व्यक्तीनिष्ठा याला कोणतीही किंमत उरलेली नाही. कोण जास्त पैसा वाटतो, हेच निकष ठरले आहेत. त्यामुळे ज्याला राजकारण करायचं आहे, त्याने आधी पैसा कमवावा, निवडणुकीत तो वापरावा आणि नंतर पाच वर्षे जनतेकडे पाठ फिरवावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.”शेवटी, “ज्यांना खऱ्या अर्थाने राजकारण करायचे नाही, त्यांनी कुटुंबाकडे लक्ष द्यावे,” असा सल्लाही नवले यांनी दिला.निर्मला नवले यांच्या या वक्तव्यांमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
शिरूर! कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का…
महिला सरपंचांच्या नावावर पतीचा कारभार आता चालणार नाही
रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?