आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र

१३ दिवसांपासून उपोषण सुरू; महायुती सरकारवर आदिवासीविरोधी असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

मुंबई: राज्यातील पुणे, नाशिक, वर्धा, पालघरसह विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थी गेल्या १३ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. मात्र, राज्यातील भाजपा-महायुती सरकारला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

नाशिक येथे उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची सपकाळ यांनी भेट घेतली. यावेळी खासदार शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, आदिवासी विकास विभागात भ्रष्टाचार बोकाळला असून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत. विद्यार्थी गेल्या १०-१३ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत; मात्र सरकारमधील एकाही मंत्र्याने त्यांची दखल घेतलेली नाही. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, पण त्यातही आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही, असा दावा त्यांनी केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या प्रश्नाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून त्या तातडीने मंजूर केल्या पाहिजेत. हे सरकार आदिवासी, दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके राहुल गांधी यांना आदिवासी प्रश्नांची अद्ययावत माहिती नसल्याचे सांगत आहेत. मात्र, ज्या विभागाचे आपण मंत्री आहात, त्या विभागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची माहिती आपल्याला आहे का? गेल्या १३ दिवसांपासून तुम्ही काय करत आहात, असा सवाल सपकाळ यांनी केला.

विद्यार्थिनींच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली गर्भधारणा चाचणी घेतली जात असल्याच्या आरोपावरही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केला. या गंभीर मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी मंत्री इतर प्रश्नांवर बोलत असल्याची टीका त्यांनी केली. विद्यार्थ्यांना ‘मी काही करू शकत नाही, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा’ असे सांगणाऱ्या मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही सपकाळ म्हणाले.आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत