लोणी – पाबळ रस्त्यावरती दुसऱ्यांदा बिबट्याच्या बछड्याचा अपघाती मृत्यू…

क्राईम

वाघोली: लोणी (ता. आंबेगाव) जि. पुणे मंगळवार (दि. 2) रोजी येथील हद्दीतील सकाळी 7 वाजता बेल्हा -जेजुरी महामार्गावर लोणी -पाबळ रस्त्यावर दुसऱ्यांदा बिबट्याच्या बछड्याचा अपघाती मृत्यू झाला आहे.

संग्राम हॉटेलच्या जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अंदाजे 7 ते 8 महिन्याचा बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालक नागनाथ सुक्रे यांनी ही माहिती वन सेवक बाळासाहेब आदक यांना कळविली. त्यानंतर बाळासाहेब आदक यांनी वनरक्षक साईमाला गीते यांना ही माहिती कळवली. त्या आपल्या रेस्क्यू टीम मेंबर अशोक जाधव, वनसेवक व्ही. बी लंके आदी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाल्या. वनपाल धामणी सोनल भालेराव ह्या पण त्वरित घटनास्थळी आल्या व तपासणी करुन पंचनामा केला.

लोणी येथे मृत बछड्याचे शवविच्छेदन केले असता, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शितल कास्पे यांनी सांगितले की वाहनाची डोक्याला जोरदार धडक बसल्यामुळे अंतर्गत जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊन तसेच मागचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे बछड्याचा मृत्यू झाला आहे. वन खात्याच्या शासकीय निवासस्थानासमोर ग्रामस्थ व वन कर्मचारी यांच्या समक्ष बिबट्याच्या बछड्याचे अग्नी दहन केले.

वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सध्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड चालू असून त्यामुळे बिबटे एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे स्थलांतर करत आहे. महामार्गावर किंवा रस्त्यांनी जाताना वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहन चालवावे प्राण्यांना इजा न होईल याची काळजी घ्यावी.